30 जानेवारी रोजी मतदान आणि मतमोजणी
ऍड. गिरीश शेडगे असणार मुख्य निवडणूक अधिकारी
पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनचा वार्षिक (2020-2021) निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 30 जानेवारी रोजी मतदान होणार असून, निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी रात्री जाहीर होणार आहे. पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गिरीश शेडगे यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निवड झाली.
9 जानेवारीपासून उमेदवारी नामांकन भरता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जानेवारी आहे. 14 जानेवारीला अर्जांची छाननी होईल. 16 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 17 तारखेला उमेदवाराची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि दोन सचिव, एक खजिनदार, एक हिशेब तपासणीस आणि दहा कार्यकारिणी सदस्य अशा 17 पदांकरिता ही निवडणूक होणार आहे. उमेदवार हा पुणे बार असोसिएशनच्या घटनेनुसार आणि नियमानुसार पात्र सभासद असणे गरजेचे आहे.
अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. विजय आमले, ऍड. अनिल नाईक, ऍड. नंदकुमार वीर, ऍड. प्रशांत माने, ऍड. के. टी. आरू, ऍड. किर्तीकुमार गुजर, ऍड. सुप्रिया कोठारी, ऍड. समीर घाटगे, ऍड. विजयराज दरेकर, ऍड. मंगेश लेंडघर यांची निवड झाली आहे. तर, उपनिवडणूक अधिकारी म्हणून ऍड. पंडित धुमाळ, ऍड. अनिशा फणसळकर, ऍड. रेखा करंडे, ऍड. महेंद्र कुमकर, ऍड. विजयकुमार शिंदे, ऍड. सुहास फराडे, ऍड. विजय माने, ऍड. जयदीप कदम हे काम पाहणार आहेत. तर, ऍड. सुधीर घोरपडे, ऍड. संतोष घुले, ऍड. विक्रम हगवणे, ऍड. राकेश ओझा, ऍड. प्रतीक देशमाने, ऍड. स्वप्निल चांदेरे, ऍड. राहुल भरेकर, ऍड. श्रृती संकपाळ आणि मुकुंद पवार हे सहायक निवडणूक अधिकारी आहेत.