शिखर धवन, पृथ्वी शॉला मिळणार संधी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यात 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. ही लढत साउथॅम्प्टन येथे होणार आहे. आयपीएल स्थगित झाल्यामुळे व भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातल्यामुळे बीसीसीआय लवकरच कसोटी क्रिकेटच्या या सामन्यासाठी संघाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. या संघात सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

या सामन्यासाठी विराट कोहलीकडेच संघाच्या कर्णधारपदाची, तर अजिंक्‍य रहाणे त्याला उपकर्णधार म्हणून साथ देण्यासाठी उपस्थित असेल. याशिवाय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सलामीची जबाबदारी सांभाळेल. रोहितला साथ देण्यासाठी शिखर धवन किंवा पृथ्वी शॉला खेळविण्याची संभावना आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलामीवर शुभमन गिलला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला 19.80च्या सरासरीने 119 धावाच करता आल्या. तसेच यंदाच्या आयपीएलमध्येही त्याचे खराब प्रदर्शन राहिले. दुसरीकडे शिखर धवनने आयपीएलच्या 8 सामन्यात 380 धावा रचल्या. तसेच पृथ्वी शॉनेदेखील 308 धावा केल्या आहेत. या दोघांनीही तीन-तीन अर्धशतके ठोकली आहेत. पण इंग्लंडच्या मैदानावर कोणाला संधी मिळेल हे लवकरच समजेल.

कसोटी तज्ज्ञ चेतेश्‍वर पुजाराचे संघात स्थान कायम राहील. त्याच्यासोबत भारताच्या मधल्या फळीत ऋषभ पंत, हनुमा विहारी व वृद्धिमान साहादेखील असतील. पंत संघाचा पहिला विकेटकीपर असून, साहाला संधीची प्रतीक्षा करावी लागेल. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा, आर. अश्‍विन, हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला जाण्याची शक्‍यता आहे.
दुसरीकडे गोलंदाजी विभागात अनुभवी व नवख्या खेळाडूंना संधी मिळू शकते. जडेजा, अश्‍विनसोबत अक्षर पटेल तिसरा फिरकी गोलंदाज असेल. वेगवान गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, महंमद शमी, ईशांत शर्मासह ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विरोधात कमाल करणाऱ्या शार्दुल ठाकूर व महंमद सिराजलादेखील संघात स्थान मिळू शकते.

मे अखेरीस संघ होणार रवाना?

आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळाडू यूकेला रवाना होणार होते; परंतु आता आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने आणि करोनाचा प्रादुर्भाव पाहता, भारतीय संघ मेच्या शेवटच्या आठवड्यात यूकेला रवाना होऊ शकतो. यासोबतच न्यूझीलंड संघातील काही खेळाडू भारतीय संघासोबत प्रवास करू शकतात. यासंदर्भात यूके सरकारसोबत भारतीय खेळाडूंच्या प्रवासाबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. भारतात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ब्रिटननेही भारताला रेड लिस्टमध्ये टाकून प्रवास करण्यावर निर्बंध लागू केले आहेत. तसेच इंग्लंडमध्ये जाणाऱ्या खेळाडूंनादेखील विलगीकरणात राहावे लागणार आहे.

संभाव्य भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्‍विन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, महंमद शमी, महंमद सिराज.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.