टाकळीभान, (वार्ताहर) – टाकळीभानच्या विकासात मोलाचा वाटा असणारे स्व. अण्णासाहेब (अप्पा) पटारे पाटील हे खऱ्या अर्थाने “विकास पुरुष” ठरले. त्यांनी परिसरातील शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक- युवती व तरुण- तरुणींना त्यांच्या क्षेत्रातील निगडित उद्योग व्यवसायासाठी चालना दिली. शेती क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्राचे बीज त्यांनी गावात रोवली. टाकळीभानसाठी वरदान लाभलेल्या “टेलटँक” साठी त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देत टाकळीभानचा सर्वांगीण विकास साधताना स्व. आप्पांनी आपल्या नेतृत्वातून राजकारणाला लोकाभिमुख केले, असे प्रतिपादन कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे यांनी केले.
सहकार, शेती, शिक्षण, प्रगत टाकळीभानचे शिल्पकार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. अण्णासाहेब पटारे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त ज्येष्ठ नागरिक आणि अप्पांचे सहकारी रामकृष्ण मैड, ज्ञानदेव साळुंके यांच्याहस्ते विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रयतचे बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन दत्तात्रय नाईक, माजी सरपंच मंजाबापू थोरात, बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, कारखान्याचे संचालक यशवंत रणनवरे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन राहुल पटारे, मधुकर कोकणे, रावसाहेब वाघुले, ग्रा.पं सदस्य सुनील बोडखे, दत्तात्रय पटारे, भाऊसाहेब पटारे , महेश लेलकर, शिवाजी पटारे, बाबासाहेब पटारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन
स्व. अण्णासाहेब पटारे यांचा नातू असल्याचा अभिमान आहे. त्यांचा सहवास आम्हाला लाभला नाही परंतु त्यांचा सुसंस्कृत वारसा चालविण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील. पुढच्या वर्षी १ जानेवारीला त्यांच्या जयंती निमित्त मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.- मयूर पटारे,संचालक,बाजार समिती, श्रीरामपूर