जामखेड (प्रतिनिधी)- गेल्या सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील गुरुवारपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर व्हावे, या मागणीसाठी जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून उपोषणास बसले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तरी देखील याबाबत सरकारने कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा म्हणून आता मनोज जरांगे पाटलांसारखे दिसणारे हुबेहूब जामखेड तालुक्यातील भुतवडा गावचे तरुण हनुमंत मोरे हे देखील आमरण उपोषणाला बसले आहे,त. हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. उपोषणकर्ते हनुमंत मोरे व मराठा क्रांती मार्चाच्या वतीने तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले होते.
उपोषणादरम्यान मोरे यांनी सांगितले की, मी जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतो, याचा मला अभिमान वाटतो. मोरे हे जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ते आंतरवाली सराटी येथे देखील गेले होते. जामखेड येथन मुंबईकडे निघालेल्या मोर्चात सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने होणार्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा.मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, विकास राळेभात, मंगेश आजबे, संभाजी राळेभात, महादेव डोके, जयसिंग डोके, पवनराजे राळेभात, अवधूत पवार, तात्यासाहेब बांदल, डॉ.भरत देवकर, डाॅ. प्रशांत गायकवाड, महेश यादव, दादासाहेब नागरगोजे, विष्णू सागडे, सलीम शेख, सुनील नवगीरे, लखन तुपसुंदर, पांडुरंग मोरेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.