इंदापूर नगरीच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी शहराचे नाव देशपातळीवर पोहोचवले आहे. सर्वसामान्यांशी कणव, शहरविकासाचा ध्यास, पर्यावरणचळवळीतील योगदान, पायाभूत विकासासाठी भरीव निधी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधणाऱ्या अंकिता शहा यांनी इंदापूरला नवा आयाम प्राप्त करून दिला आहे.
प्रत्येक घटकांपर्यंत मदत पोहचविणाऱ्या त्या जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्षा आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेतला आहे. नवदुर्गाच्या रुपाने त्यांचा सार्थ अभिमान शहरवासियांसह तालुक्याला आहे.
इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा अंकिता शहा या भाभी नावाने ओळखल्या जातात. त्यांनी कार्याचा ठसा सर्वसामान्यांमध्ये निर्माण केला आहे. शहरामध्ये स्वच्छता चळवळ निर्माण करून नागरिकांमध्ये जनजागृती करून शहर स्वच्छतेचा ठसा देशभरात उमटविला आहे.
स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सलग तीनवेळा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरी करून इंदापूरकरांची मने जिंकली आहेत. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी काम केले. इंदापूरची आधुनिक युगातील नवदुर्गा म्हणून त्यांनी देशभरात इंदापूरची ओळख निर्माण करून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
थकीत वीजपुरवठा, पाणीपुरवठा, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न, कर्मचाऱ्यांची थकीत देणी, स्वच्छतेच्या समस्या, शहराचे सौंदर्य, सांडपाणी व्यवस्था, रस्ते, शौचालय, प्रशासकीय इमारती, शॉपिंग सेंटर आदी कामांत त्यांनी कटाक्षाने लक्ष केंद्रीत केले. सर्व नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधून त्यांनी समस्या तळमळीने सोडविल्या आहेत.अंकिता भाभी या नामांकित सुशिक्षित व दानशूर कुटुंबातील सून आहेत.
परंतु याचा कसलाही गर्व न बाळगता सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत असल्याची प्रचिती इंदापूरवासियांनी येत आहे. कुटुंब, दुकानामधील जबाबदारी सांभाळत त्या शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी, वैभवासाठी, मूलभूत सोयीसुविधांसाठी त्या झटत आहेत. शहरातील सर्व भागामध्ये सतत संपर्क ठेवून प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात.
नगराध्यक्षपदाला न्याय देणारी एक आदर्श भगिनी म्हणजे अंकिता भाभी होय. करोनाच्या संकटात अंकिता शहा यांचे कार्य मोठे आहे. या कार्याला सामाजिकतेची जोड देऊन सर्व घटकांना आधार दिला आहे. लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबाला अन्नधान्य किट दिले. करोनाविरोधात लढण्यासाठी जनजागृती केली. नगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाठीशी ठाम उभे राहून नव्हे तर त्यांच्या बरोबरीने काम केले.
कोविड केअर सेंटर, करोनाच्या सर्वेक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. नागरिक व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुख- दुःखात उभे राहून त्यांना पाठबळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. शहरामध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले होते. अशा परिस्थितीत मोठे संकट उभे असताना देखील न डगमगता त्यांच्या पाठीशी राहून पूरपरिस्थिती आटोक्यात आणली.
शहरात स्वच्छता मोहिमेत नागरिकांना सहभागी केले. ओला कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी दुभाजकामध्ये केलेल्या वृक्षारोपण अभियानाला प्राधान्य देऊन पूर्ण केले आहे. शहरात हरितक्रांतीचा वसा जपला आहे.
इंदापूर शहर व परिसर त्यांच्या कार्याला मनापासून सहकार्य करीत आहे. नागरिकांच्या सहकार्याने इंदापूरचा नावलौकिक देशात प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट शहर म्हणून करण्यात अंकिता मुकुंद शहा यांचे योगदान आहे. तसेच मोलाचा वाटा आहे.
शब्दांकन : नीळकंठ मोहिते, रेडा