मेलबर्न – भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिने रशियाची सहकारी कॅमिला राकीमोव्हासह महिला दुहेरीत खेळताना फिलिफ आयर्लंड टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अंकिता व राकीमोव्हा जोडीने अंतिम सामन्यात रशियाच्या ऍना ब्लिन्कोव्हा व अनास्थाशिया पोटापोव्हा जोडीवर 2-6, 6-4 व 10-7 अशी तीन सेटमध्ये मात केली. अंकिता व राकीमोव्हा जोडीला पहिला सेट गमवावा लागला होता. मात्र, त्यानंतरही त्यांनी निराश न होता सामन्यात धडाक्यात पुनरागमन केले व नंतरचे दोन्ही सेट जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
डब्ल्युटीए सिरीज टेनिस स्पर्धांमधील अंकिताचे हे पहिलेच विजेतेपद ठरले. या कामगिरीमुळे आता या स्तरावरच्या क्रमवारीत अंकिताने पहिल्या 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झानंतर अशी कामगिरी करणारी अंकिता भारताची दुसरी टेनिसपटू ठरली आहे. अंकिताने आपल्या कारकिर्दीत यापूर्वी आयटीएपीचे दुहेरीचे तर, डब्ल्युटीए सिरीज 125 पात्रता स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले आहे.