मुंबई – गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करणारा शो म्हणून द कपिल शर्मा शोकडे पाहिले जाते. प्रेक्षक आवडीने हा शो पाहताना दिसतात. या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकारही हजेरी लावतात. मात्र, आता द कपिल शर्मा शो काही दिवसांसाठी बंद होणार आहे. लवकरच या शोचा फिनाले पाहायला मिळणार आहे. या फिनालेमध्ये अभिनेते अनिल कपूर धमाका करताना दिसत आहेत. याचा एक प्रोमोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
या प्रोमोच्या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा आणि अनिल कपूर यांच्यातील संवाद दिसून येत आहे. कपिल शर्मा म्हणतो की, “मागच्या वेळी देखील फिनालेसाठी तुम्ही शोमध्ये आले होते.” यावर बोलताना थेट अक्षय कुमार याला टार्गेट करताना अनिल कपूर म्हणतात की, “होय….अक्षय कुमार या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पैसे घेऊन येतो. मी द कपिल शर्मा शोच्या फिनालेला पैसे न घेता येतो, हाच फरक आमच्यामध्ये आहे.”
यावरून कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावण्यासाठी अक्षय कुमार हा तगडी फिस घेतो, असे समोर येते. तर अनिल कपूर हे कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यासाठी कोणत्याही प्रकारची फिस घेत नाहीत, असे स्पष्ट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, द कपिल शर्मा शो काही दिवसांसाठी बंद होणार आहे. मात्र, लवकरच या शोचा नवीन सीजन घेऊन कपिल शर्मा येणार आहे. त्यामुळे चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी कलाकारांना पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये येण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मिली या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जान्हवी कपूर आणि बोनी कपूर हे द कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते.