मुंबई : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. खानापूर आटपाडी मतदारसंघात 2024 मध्ये भाजपचा उमेदवार असेल असा दावाही पडळकरांनी केला आहे. पडळकरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
खानापूर-आटपाडीत 2024 मध्ये भाजपचा आमदार असेल, आमदार अनिल बाबर 2024 मध्ये निवडणूक लढवणार नाहीत, असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडीमध्ये आता भाजपचा दावा प्रस्थपित केला आहे. खानापूर तालुक्यातील मोही येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांच्या सत्कार समारंभासाठी पडळकर बोलत होते.
बारामती विधानसभा मतदारसंघात 2019 साली निवडणूक लढवत होतो. त्यावेळी आमदार बाबर व त्यांचे पुत्र अमोल बाबर यांनी बारामतीच्या क्लब हाऊसमधील पहाटेच्या बैठकीत मला 2024 ला तुमच्या पाठीशी राहत असल्याचा शब्द दिला होता. तो शब्द आता ते पिता-पुत्र पाळतील. त्यामुळे बाबर हे खानापूर मतदारसंघात 2024 ची निवडणूक लढविणार नाहीत असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
अनिल बाबर भाजपकडून लढणार की शिंदेंकडून? असे अनेक प्रश्न पडळकरांच्या वक्तव्यावरून निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अनिल बाबर हे खानापूर मतदारसंघात 2024 ची निवडणूकच लढवणार नाहीत असा गौप्यस्फोट आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.