सांगली : राज्यातील राजकीय परिस्थिती सध्या ढवळून निघाली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टांगती तलवार असून लवकरच सत्तांतर होण्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र एकीकडे सत्ता नाट्य सुरु असताना दुसरीकडे शिवसैनिकांमध्ये संताप असल्याचे दिसून येत आहे. आज सांगलीमध्ये शिवसैनिकांनी आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर टरबूज फेक आंदोलन केले आहे. या आंदोलन प्रकरणी पोलिसांकडून काही शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भाजप फोडाफोडीचे राजकारण करून सरकार संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी जमलेल्या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली एवढेच नाही तर आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा देखील केला आहे. शिवाय भाजपसोबत जाऊन तते सत्ता स्थापन करण्याच्या देखील चर्चा असल्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय. शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैंगुरे यांच्यासह विजय शिंदे गजानन मोरे यांनी भाजप आमदार सुरेश खाडे यांच्या कार्यालयावर टरबूज फेकत आंदोलन केले.