प्रेयसी रिक्षावाल्यासोबत पळून गेली; प्रियकराने असा घेतला ‘बदला’

पुणे – प्रेयसी धोका देऊन रिक्षा चालकाबरोबर पळून गेल्याचा राग एका तरुणाने रिक्षा चालकांचे मोबाईल चोरुन काढला. त्याने एक दोन नव्हे तर तब्बल 80 रिक्षा चालकांचे मोबाईल चोरले. त्याला लष्कर पोलिसांनी अटक केल्यावर ही बाब उघडकीस आली. त्याची कहाणी ऐकल्यावर पोलिसांनीही डोक्‍याला हात लावला. त्याने पुणे-मुंबईसह इतर अनेक शहरांतील रिक्षा चालकांचे मोबाईल चोरले आहेत.

आसिफ उर्फ भुरा शेख (37 , सध्या रा. पूना कॉलेज जवळ, मूळ रा. बिहार, उत्तर प्रदेश) असे या चोरट्याचे नाव आहे. आसिफची प्रेयसी अहमदाबाद( गुजरात) येथील होती. तो सध्या पूना कॉलेज जवळ राहण्यास होता. काही महिन्यांपूर्वी अचानक त्याच्या प्रेयसीचे एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. याची खबर आसिफला लागायच्या आता तिने रिक्षावाल्या सोबत पळ काढला.

“प्रेमभंग झाल्याने त्याचा बदला म्हणून हा चोरटा रिक्षा चालकांना टार्गेट करून त्यांचे महागडे फोन चोरत होता. त्याने 80 मोबाईल चोरले असून त्यापैकी 12 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
– चंद्रकांत भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस स्टेशन

आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेल्याचे समजताच आसिफला धक्का बसला. यातूनच त्याच्या मनात रिक्षाचालकांची चीड निर्माण झाली. प्रेयसीचा विरह आणि रिक्षा चालकांची चिड यातून त्याने रिक्षा चालकांना टार्गेट करण्याचे प्रयत्न केले. तो कात्रज, कोंढवा तसेच शहरातील विविध भागातून रिक्षा मधून प्रवास करायचा यानंतर रिक्षा चालकांकडे महागडे मोबाईल आहेत का? हे पहायचा. इच्छित स्थळी उतरल्यानंतर आपला मोबाईल घरीच राहिला असल्याची बतावणी करत एक कॉल करण्यासाठी रिक्षा चालकाकडून मोबाईल घ्यायचा.

रिक्षा चालकाचे लक्ष नसल्याचा फायदा घेत मोबाईल घेऊन तो पोबारा करत होता. मोबाईल चोरणाऱ्या आसितची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. त्याने चोरीचे कारण सांगितल्यानंतर पोलिसांनी तर डोक्‍याला हात लावून घेतला आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.