नगर – अंगणवाडी सेविका पारंपरिक पद्धतीने सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजनांच्या नोंदी, लसीकरण यांसह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवण्यात येतो. या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागतो.
मात्र, यावर आता मात करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात आले असून, त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामाचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास सुरवात झाली आहे. पोषण अभियानअंतर्गत (आयसीटी-आरटीएम) या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून, सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका यांना स्मार्टफोन दिले आहेत. केंद्र शासनाकडून अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांना स्मार्ट फोन देण्यापूर्वी हे नवीन ऍप कसे हाताळावे, त्यात माहिती कशाप्रकारे भरण्यात यावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरु केलेल्या आहेत. या अंगणवाडी केंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच त्यांचे वजन, उंची, त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना 11 प्रकारच्या विविध रजिस्टरमध्ये लिहून ठेवावा लागत होता. मात्र आता सेविकांना स्मार्ट फोनमध्ये विशेष ऍप असल्याने, त्यातच सर्व नोंदणी होईल.
बालकांची माहिती ऍपवरच भरणार
जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडीसेविकांना आता स्मार्ट फोन दिला जाणार आहे. त्यात शून्य ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची माहिती ऍपद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्राचीही आता डिजिटलकडे वाटचाल सुरू झालेली आहे. मोबाइलमधील ऍपमध्ये बालकाच्या वैयक्तिक माहितीसोबतच त्याचे लसीकरण कधी झाले, आगामी लसीकरण कधी आहे, याबाबत त्यांच्या पालकांना मेसेज पाठविण्यासाठी बालकांच्या पालकांचेही मोबाइल नंबर घेण्यात येणार आहेत.