पोलिसांचा “वॉच’ : “लेन कटिंग’, वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर करडी नजर
राज्य सुरक्षा बलाच्या 120 जवानांकडून टेहळणी
कामशेत : पुणे आणि मुंबई महानगरांमधील अंतर कमी करणाऱ्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आता वेगमर्यादा आणि लेनची बिघाडी सुसाट दिसते. बेशिस्तीमुळे वाढत्या अपघातांच्या घटनांना “ब्रेक’ लावण्यासाठी पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवले आहे. त्यामुळे आता लेनची शिस्त आणि अतिवेगावर “कंट्रोल’ ठेवण्यात येत असून, वाढते अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून द्रुतगती मार्गाच्या करडी नजर ठेवण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून “लेन’ची शिस्त मोडणाऱ्या वाहनांचे छायाचित्र घेऊन त्यांच्यावर “ऑनलाइन’ पद्धतीने दंड आकारला जात आहे.
पुणे-मुंबई दुतगती मार्गावर एका बाजूस तीन लेन आहेत. त्यातील तीन क्रमांकाची लेन ही टेम्पो, ट्रक यांसारख्या अवजड वाहनांसाठी आहे. मोटारीसाठी दोन क्रमांकाची लेन आहे. आता “ओव्हरटेक’ करण्यासाठी अवजड वाहनांनी दोन क्रमांकाची लेन वापरायची आहे, तर मोटार चालकांनी एक क्रमांकाची लेन वापरायची आहे, अशी “लेन’ची शिस्त आहे. तर अवजड वाहनासाठी 80 कि.मी. प्रतितास ही वेगमर्यादा आहे. मोटारीसाठी 100 कि.मी. प्रतितास ही वेगमर्यादा देण्यात आली आहे.
द्रुतगती मार्गावर अशी नियमावली असताना लेनची शिस्त मोडून अवजड वाहन चालक मोटारीच्या लेनने अवजड वाहन चालवत असल्याने अवजड वाहनास पाठीमागून येणारी मोटार धडकून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहने ही धीम्या गतीने जातात आणि अशी धीम्या गतीने दोन क्रमांकाच्या लेनने अवजड वाहनास पाठीमागून वेगात येणारी वाहने धडकून अपघात घडतात.
तर वेग मर्यादा डावलून अतिवेगात वाहन चालविल्याने टायर फुटणे किंवा चालकाचे नियंत्रन सुटून होणारे अपघात वाढले आहेत. महामार्ग पोलिसांनी वेग मर्यादा डावलणारे व लेनची शिस्त मोडणाऱ्या वाहनांची छायाचित्र घेऊन त्यांच्यावर “ऑनलाइन’ पद्धतीने दंड आकारण्यात येतो आहे. महामार्ग पोलिसांना या कामात मदत करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 120 जवान द्रुतगती मार्गावर ठीक-ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.