नवी दिल्ली :– प्रसिद्ध अभिनेता अंगद बेदी याने दुबई येथे झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. हे पदक त्याने आपले वडील व भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्या स्मृतींना अर्पण केले आहे.
बिशन सिंग बेदी यांचे 23 ऑक्टोबर रोजी निधन झाले. दीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहिल्याच आंतरराष्ट्रीय शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्यासाठीची ऊर्जा मला माझ्या वडिलांकडून मिळाली. आज ते आपल्यासोबत नाहीत; परंतु ते माझ्या स्मृतीत कायम राहतील. माझे यश मी त्यांना समर्पित करत आहे, असे अंगदने म्हटले आहे.
तसेच अंगदने त्याचे प्रशिक्षक आणि अभिनेत्री पत्नी नेहा धुपिया यांचेही आभार मानले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “घुमर’ या चित्रपटात अंगदने एक भूमिकाही साकारली होती. अभिनयासह त्याची क्रीडा क्षेत्रातही उत्तम धावपटू अशी ओळख आहे.