नवी दिल्ली – खेळाडूंपेक्षा पदाधिकारी मोठे करण्याचे उद्योग संघटनेत सुरू असल्याची टीका माजी कसोटीपटू बिशनसिंग बेदी यांनी दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेवर केली आहे. तसेच फिरोजशाह कोटला मैदानावरील एका प्रेक्षक गॅलरीला देण्यात आलेले माझे नावही काढून टाकावे आणि संघटनेशी असलेले माझे सदस्यत्वही रद्द करावे, अशी मागणीही बेदी यांनी केली आहे.
संघटनेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली होते. त्यांचे निधन झाल्यावर संघटनेने त्यांचे नाव फिरोजशाह कोटला मैदानाला दिले. हे नामांतर मला पसंत नाही. जर मैदानाला किंवा स्टॅण्डला नाव द्यायचेच असेल तर ते खेळाडूंचे द्यावे, असे माझे मत आहे.
त्यावेळीही मी संघटनेच्या या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, त्यावेळी जेटली यांच्या घरी ही बैठक सुरू असताना मोठा वाद घडला व अखेर मी बैठक सोडून बाहेर आलो. त्यानंतरही मी सातत्याने संघटनेच्या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, दडपशाहीने संघटनेने त्यांचे नाव मैदानाला दिले.
पदाधिकाऱ्यांचे स्थान संघटनेच्या कार्यालयातील केबीनमध्येच असावे, मैदानाला किंवा स्टॅण्डला नाव द्यायचे तर ते केवळ खेळाडूंचेच द्यावे. ज्या प्रमाणे लॉर्डस डब्ल्यू जी ग्रेस, ओव्हल सर जॅक हॉब्स, सिडनी सर डॉन ब्रॅडमन, बार्बाडोस सर गारफिल्ड सोबर्स तर मेलबर्न शेन वॉर्न यांच्या नावाने ओळखले जाते तर मग आपल्याकडे त्याच धर्तीवर नाव का दिले जात नाही. संघटनेवर कार्यरत असलेल्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे नाव कसे दिले जाते, असा सवालही बेदी यांनी केला.