हॉलीवुड – मेक्सिकोची सुंदरी अँड्रिया मेझा हिला येथे काल झालेल्या स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मेझाने अंतिम फेरीत ब्राझीलच्या स्पर्धक मुलीला मागे टाकून हा सन्मान प्राप्त केला.
गतवर्षीची विजेतील झोजबिनी तुंझी हिने मेझाच्या डोक्यावर हा मुकुट लावला. मारिओ लोपेझ आणि ओलिव्हीया कुल्पो यांनी अंतिम फेरीचे सूत्रसंचलन केले. संपूर्ण जगातील 160 देशांमध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे थेट प्रसारण करण्यात आले.
The new Miss Universe is Mexico!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/Mmb6l7tK8I
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
जगभरातील सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य ते निर्बंध पाळून ही स्पर्धा घेण्यात आली. त्याला दर्शकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. मिस युनिव्हर्स संघटनेच्या अध्यक्ष पौला शुगार्ट यांनी सांगितले की, ही स्पर्धा सुरक्षित वातावरणात पार पडावी म्हणून गेले अनेक महिने नियोजन केले होते. ते सार्थकी लागल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.