अपघातातील गंभीर जखमी महिला आणि पोटातील अर्भकाला ससूनमध्ये जीवदान
पुणे – गंभीर अपघात होऊनही गर्भवती महिलेला बाळासह वाचवण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले. तिची यशस्वीरित्या प्रसुती करून आणि महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करून दोघांनाही जीवदान देण्यात आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2021 रोजीच हा अपघात झाला होता.
21 वर्षीय गर्भवती महिलेचा 1 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दुचाकीवरून पडून अपघात झाला होता. तिला ताबडतोब ससून
सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी स्त्रीरोग आणि शल्यतंत्र तज्ज्ञांनी तिची तपासणी केली असता, तिच्या पोटावर बेंबीच्या वरच्या बाजूला दोन जखमा दिसल्या. तसेच एका जखमेतून “ओमेंटम’ (जठर आणि अन्य इंद्रियांना जोडणारी उदरवेष्टणाची घडी) हा आतड्याचा भाग बाहेर आलेला दिसून आला. पोटातील बाळाचे ठोके मात्र ऐकू येत होते.
पोटामध्ये रक्तस्त्राव झाल्याची शक्यता गृहित धरून त्या महिलेची तत्काळ सोनोग्राफी करण्यात आली आणि पोटामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. सदर महिलेला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आले आणि डॉक्टरांनी तिचे सिझेरियन करून, बाळाला सुखरूप बाहेर काढले. बाळाचे वजन 2100 ग्रॅम होते. परंतु महिलेला एवढा गंभीर मार लागला होता की, पोटातील बाळाच्या कमरेवर दोन ठिकाणी जखमा झाल्याचे तपासणीअंती दिसून आले.
सिझेरियन नंतर डॉक्टरांनी महिलेचा “ओमेंटम’चा बाहेर आलेला भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकला. अन्य अवयवांची तपासणी केली असता गर्भपिशवीवरही जखमा आढळून आल्या.
या शस्त्रक्रियेमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा नाईक, डॉ. तेजस्विनी काळे, डॉ. स्नेहल तिनईकर, डॉ. प्रज्ञा, डॉ. अनुष्का आणि सर्व डॉक्टर नाईक युनिट टीमने प्राध्यापक आणि स्त्रीरोग आणि प्रसुती विभाग प्रमुख डॉ. रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. यांच्या सोबत शल्यतंत्र तज्ज्ञ टीम डॉ. किरण जाधव, डॉ. दयानंद, डॉ. मनोज हे देखील सहभागी झाले होते. बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर यांच्या चमुने नवजात बाळावर उपचार केला.
रस्ता अपघातांमध्ये बऱ्याच वेळा गर्भ पिशवीला गंभीर दुखापत होते. अतिरिक्त स्राव यामुळे आई आणि पोटातील बाळाचा जीव दगावण्याची शक्यता जास्त असते. परंतु, अचूक आणि योग्य वेळेत निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया यामुळे आई आणि पोटातील बाळ वाचवण्यात ससून सर्वोपचार रुग्णालयातील टीमला यश आले आहे. आई आणि बाळ सुखरूप वाचले ही खऱ्या अर्थाने नववर्षाची सुखद भेट मिळाली असे म्हणता येईल.
– डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता ससून सर्वोपचार रुग्णालय