पुणे – कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिक्षण घेत ती काम करत होती…तिचे लष्करात जाण्याचे स्वप्न होते. पण, तळवडे आग दुर्घटनेने आता सारेच संपले. घर चालवण्यासाठी ती त्या कारखान्यातून पैसे मिळवत होती. पण, घात झाला.. आणि या आगीत सुमारे ९० टक्के भाजलेल्या प्रतिक्षा तोरणे हिने शनिवारी प्राण सोडला. मुलगी गेल्याचे समजताच आई-वडिलांनी हंबरडा फोडला. बाळा तू कुठेस असे म्हणत रडणाऱ्या त्या अभागी माता-पित्याकडे पाहून ससून रुग्णालयाचा परिसरदेखील हळहळला.
घरची परिस्थिती हलाखीची. वडिल सुरक्षारक्षक. तर प्रतिक्षा आणि तिची बहीण अपेक्षा शिक्षण घेत कारखान्यात काम करत होत्या. एकीला पोलीस दलात भरती व्हायचे होते, तर दुसरीला सैन्यदलात. मात्र, आगीमध्ये दोघी बहिणी 90 टक्के भाजल्या होत्या. आता अपेक्षा देखील गंभीर जखमी आहे. याच घटनेत जखमी कविता राठोड यांचाही दुपारी मृत्यू झाला. पती मोलमजुरी, तर मुलगी आणि आई कविता या दोघी याच कारखान्यात काम करत होत्या.
दोघींवर शेजारी शेजारी बेडवर उपचार सुरू होते. ‘बाळा खूप त्रास होतोय ना? एवढेच शब्द ऐकताच डोळ्यांत अश्रू आले. वेदनेने व्याकुळ माय-लेकी एकमेकींकडे पाहून धीर देत असताना, आईने प्राण सोडले. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनांनी अन्य जखमींचे नातेवाईकही गुडघ्यावर डोके ठेवून हतबल असल्याचे चित्र ससून परिसरात आहे.
“पत्नी आणि मुलगी उपचार घेत असून, त्यांची अवस्था न बघवणारी होती. आधीच मुलीच्या वाट्याला दु:ख, त्यात ही घटना. सगळे दु:ख आमच्याच वाट्याला का?” – गणेश राठोड, मृत कविता राठोड यांचे पती
“माझ्या मुलीने रात्रभर मृत्युशी झुंज दिली, मात्र ती अयशस्वी ठरली. माझी दुसरी मुलगी लवकर बरी व्हावी हीच इच्छा.” – अशोक तोरणे, प्रतिक्षा आणि अपेक्षाचे वडील