सांगली – गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीतील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या हट्टापायी बनवलेल्या जुगाड जिप्सीची खुप चर्चा झाली. लाखो लोकांनी त्यांच्या या जिप्सीचा व्हिडीओ पाहिला आणि त्यांचे तोंडभरून कौतुक केले. आनंद महिंद्रा यांच्यापर्यंतदेखील हा व्हिडीओ पोहोचला आणि त्यांनी लोहार यांना थेट त्या जिप्सीच्या बदल्यात बोलेरो देण्याची ऑफर दिली. दिलेल्या शब्दानुसार आज महिंद्रा कंपनीने लोहार यांना बोलेरो सुपूर्त केली व जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली.
आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला. यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत. यावेळी बोलेरो गाडीचे पूजन माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम यांनी केले.
दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे. आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रय लोहार यांनी गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले. कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली. दत्तात्रय लोहार यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. फॅब्रिकेशनचा त्यांचा व्यवसाय आहे. ते कामही त्यांनी फॅब्रिकेशन दुकानात बघून शिकले आहे. मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.