पुणे, दि. 1 – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची बॅक डेटेड माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाइल ऍप व वेबपोर्टलच्या माध्यमातून भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दि. 4 ऑक्टोबरपर्यंत ही सुविधा चालू राहणार आहे.
शाळांनी ऑनलाइन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन-भाजीपाला व धान्यादी मालांची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळांचे ऑनलाइन माहिती भरण्याचे कामकाज बंद असणे व दरम्यानच्या कालावधीत कोरड्या स्वरुपातील धान्यादी मालाचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आल्याने ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यात आलेली नाही. मार्च 2022 पासून शाळास्तरावर आहार शिजवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक शाळांचे ऍप अद्यावत नसणे, शिक्षकांची नोंदणी नसणे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे दैनंदिनी उपस्थितीची माहिती भरण्याचे प्रलंबित असल्याची निवेदने प्राथमिक शिक्षण संचालनालयास प्राप्त झाली होती.
मार्च ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील दैनंदिन प्रलंबित उपस्थिती भरण्याकरिता केंद्र प्रमुख तथा तालुका लॉगिनवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यानंतर मात्र शाळांना माहिती भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. माहिती अद्ययावत केल्याचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.