सातारा – येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शुक्रवारी सकाळी 7 वाजता शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून गौडाबाई काळे (वय 75) या ठार झाल्या. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
सातारा-बोरिवली शिवशाही बस चालकाने सुरू केली. ही बस स्थानकातून बाहेर जात असताना गौडाबाई या अचानक पुढील बाजूने बसच्या चाकाखाली आल्या. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बस सुरू असल्याचे न समजल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातामुळे बस स्थानकात गोंधळ झाला. मृत महिला पायाने अधू असून, फिरस्त्या महिलांपैकी असल्याचे समजते. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून बसचालकाला ताब्यात घेतले. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. काही दिवसांपूर्वी सातारा बसस्थानकात दोन बसेसच्या मध्ये चेंगरून बसचा वाहक गंभीर जखमी झाला होता. या घटनांमुळे मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.