प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -दहीहंडीच्या गोविंदा पथकातील जखमींवर “गोल्डन अवर’मध्ये उपचार व्हावेत, यासाठी पुण्यातील लोकमान्य रुग्णालयाने विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एक अभियान सुरू केले आहे. त्याद्वारे अपघातात जखमी झालेल्या गोविंदांना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत.
एकीकडे दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे दहीहंडी फोडताना गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागल्याचे चित्र दिसून येते. हा साहसी खेळ असला तरी उंचावरून खाली कोसळल्याने गोविंदांचा मृत्यू झाल्याचेही अनेकदा दिसते. यात त्यांना रुग्णालयात पोहोचण्याला उशीर होणे हे यामागील मुख्य कारण आहे. हे जाणून दहीहंडी सणात उत्सवाचा बेरंग होऊ नये, जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने रुग्णालयाने हे अभियान सुरू केले आहे.
गरजूंनी 9822267140 / 9881862030 या क्रमांकावर कॉल केल्यास तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मनोरे रचताना गोविंदांनी काळजी घेणे महत्वाचे आहे. याबद्दल लोकांमध्ये आणि गोविंदा पथकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. याशिवाय जखमी गोविंदावर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णालयाने 10 ऍम्बुलन्स विविध ठिकाणी ठेवण्यात येतील, अशी माहिती “लोकमान्य’चे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.