प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 16 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबिण्यात आलेल्या “सेल्फी वुईथ तिरंगा’ मोहिमेच्या फोटो अल्बमची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या मोहिमेत 1 लाख 52 हजार 559 फोटो अपलोड करून विक्रम करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “स्वराज्य महोत्सव’ आणि “हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत विद्यापीठातर्फे “युवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (दि. 9) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सोमवारी (दि. 15) हा जागतिक विक्रम नोंदविण्यात आला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत गिनीज न्यायाधीश ऋषी नाथ यांनी विद्यापीठाच्या विश्वविक्रमाच्या नोंदीची घोषणा केली. यावेळी खासदार गिरीश बापट, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश पांडे, सदस्य डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा विश्वविक्रम प्रस्थापित करत या अमृतमहोत्सवी वर्षात अमृताचा वर्षाव झाला आहे. कोणत्याही देशात त्यांच्या देशातील युवकांमधील ही प्रेरणा त्यांच्या देशाची ताकद असते. युवकांमुळेच भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाने कायमच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठाने तीन वर्षांत दोनदा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागतिक विश्वविक्रम केला आहे. हा केवळ विश्वविक्रम म्हणून नाही तर राष्ट्रीय कर्तव्याप्रती केलेला संकल्प असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.