लखनौ/ तिरुवनंतपुरम – हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एका पत्रकाराला अणि अन्य तिघाजणांना मथुरा येथून अटक केली. हे सर्वजण हाथरसच्या दिशेने जात असताना त्यांना अटक करण्यात आली.
हाथरसमधील दलित युवतीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित चौघांना आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारीच सांगितले होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात देशभरात आंदोलन पेटवण्यासाठी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून अर्थसहाय्य दिले जात होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी या संघटनेवर बंदीची मागणीही केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सिद्दीकी हा मलाप्पुरमचा रहिवासी आहे. तर आतिक उर रेहमान हा मुझफ्फरनगरचा आहे. मसूद अहमद हा बहारीच येथील तर आलम हा रामपूरचा रहिवासी आहे. सिद्दीकी यचे पूर्ण नाव सिद्दीक कप्पन असे असून तो दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार आहे, असे केरळमधील पत्रकारांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे.
‘केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्ट’ या केरळमधील पत्रकारांच्या संघटनेच्या दिल्लीतील शाखेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून सिद्दीक यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
सिद्दीक मल्याळमधील अखिमुखम डॉट कॉमशी संबंधित पत्रकार असल्याचेही पत्रकारांच्या संघटनेने म्हटले आहे. पत्रकारांच्या या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून सिद्दीक याच्या सुटकेची मागणी केली आहे.
सिद्दीक कप्पान हे पत्रकारांच्या संघटनेचे सचिव असून हाथरस येथे केवळ वार्तांकनासाठी जात होते. असे ‘केयुडब्लूजे’च्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष मिजी जोस यांनी योगी आदित्यनाथ यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
हाथरस पोलीस स्थानकाकडून अथवा उत्तर प्रदेश पोलिसांकडून सिद्दीक कप्पान यांच्या अटकेबाबत कोणतीही माहिती देण्यात अलेली नाही. अटक केलेल्या व्यक्तींकडून त्यांचे मोबाइल फोन, लॅपटॉप आणि अन्य काही साहित्यही जप्त करण्यात आले आहे. शांततेचा भंग आणि कायदा सुव्यवस्था बिघडू शकण्याच्या अंदाजावरून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चौकशी दरम्यान अटक केलेल्या चौघांचाही ‘पीएफआय’शी आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या ‘कॅम्पस फ्रंअ ऑफ इंडिया’शी संबंध असल्याचे उघड झाले आहे, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे.