पिंपरी (प्रतिनिधी) – भावाच्या खुनाचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून 18 वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच दृश्यम स्टाइलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यांपूवी झालेल्या भावाच्या खुनातील आरोपींना मदत करतो म्हणून १८ मार्च रोजी खेड तालुक्यातील रासे फाटा मराठा हॉटेलचे मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर गोळीबार केला.
त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाला. याप्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनोळखी आरोपीची ओळख पटवून अमर नामदेव शिंदे (वय 25, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला 23 मार्च रोजी अटक करण्यात आली.
त्या गुन्ह्यात मुख्य आरोपी राहुल पवार हा अद्याप फरार आहे. गोळीबाराच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 16 मार्च रोजी आरोपींनी आदित्य युवराज भांगरे (वय 18, रा. महाळुंगे,) याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो आदित्य भांगरे याने स्टेट्सला ठेवले होते.
त्याचा राग आल्याने राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून 16 मार्च रोजी आदित्य भांगरे याचा खून केला.
पोलिसांची दिशाभूल आदित्य भांगरे याचा खून करून त्याचे पुरावे आरोपींनी नष्ट केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खेड तालुक्यातील निमगाव येथे एका निर्जन स्थळी काहीतरी जात आदित्य भांगरे याचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव केला.
तसेच आदित्यच्या मोबाइल स्टेट्सवर गोव्याला जात असल्याचे दाखविले. डीएनए तपासणीतून मृतदेहाची ओळख पटवणार
आरोपींनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा गुजरात येथे एका जंगल परिसरात जाळला होता. पोलिसांनी वेलवाडा येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणी केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.