सरलेल्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत शेअर बाजारात तेजीची घोडदौड होती. गेल्या चार आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी वाढला होता. दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे पतधोरण जाहीर झाले. वाढलेल्या घाऊक आणि किरकोळ महागाईची आकडेवारी प्रसिद्ध झाली.
त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात विक्रीचा जोर वाढून निफ्टी कमी झाला. विक्रमी पातळीवर गेलेला निफ्टी आता थोडा कमी झाला. अशा परिस्थितीमध्ये आगामी काळात निफ्टी कशी वाटचाल करेल याबाबत अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
महागाई वाढल्यानंतर त्याचा निर्देशांकावर परिणाम होणे अपेक्षित असते. महागाई अनेक कारणामुळे वाढत आहे. करोनाच्या काळात वाहतुकीवर परिणाम झाला. पुरवठासाखळीवरही परिणाम झाला आहे. दरम्यानच्या काळामध्ये निर्बंध उठविले गेल्यामुळे लोक बॅंकेतून पैसे काढून खर्च करू लागले आहेत.
या कारणामुळे महागाई वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्माण झाले. कंपन्यांचे ताळेबंद जाहीर झाले असून बहुतांश कंपन्यांच्या ताळेबंदातील नफा कमी-अधिक प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यावे अशी शंका अनेकांच्या मनात येणे साहजिक आहे.
निर्देशांकांची वाढलेली पातळी, फेडरल रिझर्व्हचे व्याजदरवाढीचे संकेत व वाढती महागाई लक्षात घेता किमान तीन ते पाच टक्के करेक्शनची अपेक्षा बऱ्याच विश्लेषकांना वाटते. मात्र एकूण परिस्थिती वेगाने सुधारत असल्यामुळे दीर्घ पल्ल्यात निर्देशांक वाढतील. त्यामुळे या करेक्शनच्या काळामध्ये निवडक खरेदी करण्यास हरकत नाही.
सॅमको सिक्युरिटीजच्या विश्लेषक निराली शाह म्हणाल्या की, सरलेला आठवडा वगळता त्यापूर्वी चार आठवड्यात निफ्टी वाढला आहे. तिसरी लाट कधी येईल याबाबत गुंतवणूकदारांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे पुढील दोन आठवडे काही गुंतवणूकदार खरेदी करतील तर काही नफा काढून घेतील. अशा परिस्थितीमध्ये थोडेफार करेक्शन शक्य आहे.
तांत्रिक विश्लेषणानुसार नजीकच्या भविष्यात निफ्टी घसरला तर 15,350 पर्यंत घसरु शकतो आणि वाढला तर 15,900 पर्यंत वाढवू शकतो. सध्या निफ्टी 15,683 च्या पातळीवर आहे. सध्या मोठ्या कंपन्यांचे शेअरचे महाग आहेत. अशा परिस्थितीमध्ये मिडकॅपमधील निवडक कंपन्यांच्या शेअरची खरेदी केली जाऊ शकते.
कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घडामोड झाली. सरकारने खतावरील अनुदानात भरीव वाढ केली. सरलेल्या वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर नजरेत भरण्यासारखा आहे. यावर्षी पाऊस चांगला पडणार आहे. त्यामुळे खताची मागणी वाढणार आहे. अनुदान वाढविल्यामुळे खत कंपन्यांचा परतावा वाढू शकेल. या क्षेत्रातील निवडक कंपन्यांच्या शेअरची खरेदी करण्यास हरकत नाही.
वाचकांसाठी सूचना : या सदरातील लेखन सर्वसाधारण माहिती स्वरूपाचे असते. गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला तसेच परिस्थितीनुरूप सर्व साधकबाधक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा.