पुणे – दहावी आणि बारावीचा निकाल लागला असून आता पुढील प्रवेशासाठी विविध दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विहित मुदतीत दाखले वितरीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. वशिलेबाजी रोखण्यासाठी तसेच मुदतीत दाखले देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवीन संगणक प्रणालीचा वापर सुरू केला आहे.
त्यानुसार प्रथम अर्जास प्रथम प्राधान्य या तत्वावर या प्रणालीद्वारे दाखले वितरीत केले जात आहेत. यामुळे वशिलेबाजी करून मध्येच दाखले मिळणार नाही. एखाद्या व्यक्तीचा अर्ज ज्या क्रमाने आहे त्याच क्रमाने ऑनलाईन दाखले मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी पुणे शहर प्रांत कार्यालयाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. पुणे शहर तहसील कार्यालयाच्या अखत्यारीत सुमारे 52 महा-इ-सेवा केंद्र आहेत. या केंद्रांमधून विद्यार्थ्यांनी दाखल्यांसाठी अर्ज करावेत. यंदा ज्या क्रमाने अर्ज आहेत त्यानुसार दाखले वितरीत केले जाणार आहे.
-स्नेहा किसवे-देवकाते, पुणे शहर प्रांताधिकारी
तक्रार आल्यास केंद्रावर कारवाई
महा ई सेवा केंद्रातून दाखल्यांसाठी जादा पैसे घेत असल्याच्या तक्रारी येतात, या पार्श्वभूमीवर महा-इ-सेवा केंद्रामध्ये कोणत्या दाखल्यांसाठी किती रुपये द्यावे लागणार आहे. याबाबतचा फलक केंद्राबाहेर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर कोणत्या महा-इ-सेवा केंद्र चालकाने जादा पैसे मागितले तर त्याची तक्रार पुणे शहर तहसील कार्यालय अथवा पुणे शहर प्रांताधिकारी कार्यालयात करावी. अशा केंद्रांवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पुणे शहर प्रांताधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांनी दिली.
दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा दाखला – अर्ज, स्वघोषणापत्र, फोटो, आधारकार्ड, पत्त्याच्या पुराव्यासाठी विजेचे बील, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, फॉर्म 16 किंवा तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला,
वय-राष्ट्रीयत्व अधिवास दाखला – स्वघोषणापत्र, आधारकार्ड, फोटो, विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किवा जन्म दाखला, महाराष्ट्रातील सलग 15 वर्षे वर्षाचे रहिवास पुराव्यासाठी रेशनकार्ड, विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती.
नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र – स्वघोषणापत्र, फोटो, लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, विजेचे बिल, आधारकार्ड.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासांठी प्रमाणपत्र (ईड्ब्लूएस) – स्वघोषणापत्र, फोटो, उत्पन्न स्वघोषणापत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विजेचे बिल, करपावती, आधारकार्ड.