मुंबई – अभिनेत्री अमृता खानविलकरची मुख्य भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केले होते. या चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या यशानंतर आता अमृता आणि प्रसाद पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. लवकरच ही जोडी नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रसादने नव्या चित्रपटाचे पोस्टर सर्वत्र प्रदर्शित केले आहे. ‘पठ्ठे बापूराव’ असे या चित्रपटाचे नाव आहे. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे जीवनचरित्र या चित्रपटातून उलगडणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनाची प्रसाद ओकने केले आहे. ‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटात अमृता खानविलकर ‘पवळा’च्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram
या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रसादने लिहील की, “अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या माय बापहो…! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न ‘पठ्ठे बापूराव.’” या पोस्टनंतर प्रसादवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर अनेकांनी त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.