हडपसर – हडपसर येथील चिंतामणी राऊत हा गतिमंद विशेष मुलगा. त्याने स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हावे, ही त्याच्या वडिलांची तीव्र इच्छा. त्याच्या शारीरिक ठेवणीचा आणि भविष्याचा विचार करून त्याचे भवितव्य वेटलिफ्टिंग मध्ये घडविण्याचा मनोदय त्यांनी निश्चित केला. आज संपूर्ण कुटुंब त्याला घडविण्यात गुंतले आहे. चिंतामणीने नुकत्याच झारखंड येथे विशेष मुलांसाठी झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. त्याला ऑलम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक मिळविण्यापर्यंत वाटेल ते कष्ट घेऊन तयार करण्याचा संकल्प राऊत कुटुंबीयांनी केला आहे.
चिंतामणी हा जन्मताच गतिमंद विशेष आहे. अशा परिस्थितीतील मुलांना सांभाळण्यासाठी कुटुंबातील सर्वांनाच मोठ्या कसरतीचे असते. अशा मुलांच्या भवितव्याबद्दल घरात सतत चिंतेचे वातावरण असते. मात्र, चिंतामणीचे वडील बाळासाहेब राऊत यांनी आपल्या व्यस्त व्यावसायिक जीवनातून वेळ काढून चिंतामणीला घडविण्याचे ठाम ध्येय ठेवले आहे. त्यांनी मनातील ही गोष्ट पत्नी रूपाली, मुली कादंबरी व ऋतुजा यांना बोलून दाखवली. आपण सर्वजण मिळून चिंतामणी ला इतरांपेक्षा वेगळे बनवून दाखवू. विशेष मुलांच्या चिंतेने ग्रासलेल्या कुटुंबांसमोर एक आदर्श ठेवू, असा संकल्प या कुटुंबाने ठेवला आहे.
चिंतामणीला वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासून कुटुंबातील सर्वांनी घडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पहाटे उठणे, त्याला तयार करणे, जोर बैठका मारणे, धावणे, उड्या मारणे, हे सर्व त्याला करायला लावणे फार कंटाळवाणे होते. हे शिकण्यासाठी त्याला दोन वर्षे लागले. आई वडीलांसह दोन्ही बहिणींनाही त्यासाठी हे सर्व करावे लागले. आजही हा परिपाठ सुरूच आहेत. चिंतामणीकडून मिळणारा प्रतिसाद पाहून वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला पॉवर लिफ्टिंगमध्ये घडविण्याचे त्यांनी निश्चित केले आणि त्या दृष्टीने त्याला घरातूनच प्रशिक्षण सुरू केले.
कोल्हापूरला राष्ट्रीय स्पर्धेच्या ऑडिशन्समध्ये त्याला उतरविले होते. मात्र, तेथे त्याची निवड होऊ शकली नाही. खचून न जाता संपूर्ण कुटुंब पुन्हा माहिती घेऊन तयारीला लागले. एक-दोन महिने राजहंस मेहंदळे यांच्याकडे प्रशिक्षण घेतले. पॉवरलिफ्टिंगचे राज्याचे सचिव संजय सरदेसाई, सहाय्यक सचिव रवींद्र यादव यांचे मार्गदर्शन मिळाले. कॉमनवेल्थमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणारे टी बाकीराज पॉंडेचेरी येथे प्रशिक्षण देत असल्याचे समजले. त्यानंतर राऊत यांनी तेथील माहिती घेतली. चिंतामणीला पाँडेचेरीला प्रशिक्षण देण्याचे ठरविले. गेली एक वर्षापासून हे संपूर्ण कुटुंब चिंतामणीसमवेत केवळ त्याच्या प्रशिक्षणासाठी पाँडेचेरी येथे मुक्काम ठोकून आहे.
संपूर्ण कुटुंबच बनलेयं प्रशिक्षक :
पहाटे पाच वाजल्यापासून या कुटुंबाचा दिवस चालू होतो. व्यायाम, जिम, चालणे, कवायत, योगा, साईड वर्कआऊट असा दिवसभराचा क्रम असतो. चिंतामणीची बहिण कादंबरी व मावसबहीण अस्मिता फुले यांनी आपल्या कुस्तीच्या आवडीला मुरड घालून खास भावाच्या सरावाला मदत व्हावी म्हणून पॉवरलिफ्टिंग क्षेत्र निवडले आहे. आईवडिलांसह मोठी बहीण ऋतूजाही सतत त्याला घडविण्यात व्यग्र असते.
कुटुंबाचा निर्धार
झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चिंतामणी ९३ किलो वजनगटात खेळला. त्याने ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या याच गटातील खेळाडूचे रेकॉर्ड मोडून काढले आहे. पुढील महिन्यात युरोपमधील लिथुएनिया येथे होणाऱ्या आयपीएफ जागतिक स्पेशल ऑलिम्पिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तो भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. असे प्रतिनिधित्व करणारा या गटातील तो पहिला मुलगा आहे. हे आमच्या दृष्टीने खूप मोठे यश आहे. त्यामुळे आपण घेत असलेली मेहनत वाया जात नाही, याची खात्री पटली. त्यातूनच संपूर्ण कुटुंबाला प्रोत्साहन मिळाले. पुन्हा एकदा चिंतामणीच्यामागे सर्व शक्तीनिशी उभे राहून त्याच्या कर्तृत्वात प्राण फूंकत राहायचेच, असा निर्धार कुटुंबाने केला आहे.
“विशेष मुलांना घडविण्याच्या बाबतीत अनेक वेळा पैसे आणि वेळ ही कारणे त्यांच्या पालकांकडून सांगितली जातात. मात्र, केवळ वेळ पैसे आणि देखभालीसाठी माणूस ठेवून या मुलांना घडविणे शक्य नाही. त्यासाठी आई-वडील व भावंडांचे वेळोवेळी सततचे योगदान महत्त्वाचे आहे. चिंतामणीच्या विकासात हे जाणवले आहे. त्यामुळे विशेष मुलांच्या पालकांनी आपल्या पाल्यासाठी भरपूर वेळ देऊन सराव करून घेतल्यास या मुलांचे भविष्य घडू शकते. औषध उपचारापेक्षाही या मुलांचा व्यायाम आणि सराव खूप महत्त्वाचा असल्याचा आमचा अनुभव आहे. याच जोरावर तो एक दिवस ऑलिम्पिकवर आपली छाप उमटवील व विशेष मुलांसाठी तो आदर्श ठरेल, असा विश्वास आहे.’
बाळासाहेब राऊत (चिंतामणीचे वडील)
“चिंतामणीच्या भविष्याच्या प्रश्नाने सुरुवातीला आमचे कुटुंब हातबल होते. विशेष मुलांमधील त्याचे वेगळेपण सिद्ध करण्याचे आमचे स्वप्न होते. त्याच्याबाबत सकारात्मक होत आम्ही सर्वजण त्याला घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय स्पर्धेतील सरावाने त्याची सुरुवात झाली आहे. घरातील आम्ही सर्वजण त्याच्यासाठी व्यायाम करीत आहोत. ऑलिंपिकमध्येही केवळ विशेष म्हणूनच नव्हे तर खुल्या गटात तो कसा खेळेल यासाठीही आमचा प्रयत्न आहे. म्हणून त्याचा आहार, व्यायाम आणि खेळाच्या सरावावर आमचा भर आहे. आज त्याच्यामध्ये जो काही चमत्कारिक बदल दिसत आहे, तो केवळ खेळ आणि व्यायामानेच आहे.’
रूपाली राऊत ( चिंतामणीची आई )