मुंबई – सुषमा अंधारे या मला माझ्यासारख्या वाटत होत्या असं विधान अमृता फडणवीस यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये केलं होत. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अंधारे यांनी अमृता फडणवीस यांचा चांगलाच टोला लगावला आहे. अमृता वहिनींना मी कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं ? असा सवालच अंधारेंनी यावेळी उपस्थित केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारे म्हणतात,”अमृता वहिनींना मी त्यांच्यासारखे वाटते असं त्या जाहीरपणे एका मुलाखती दरम्यान म्हणाल्या. मी सतत विचार करत होते की मी त्यांना कोणत्या अँगलने त्यांच्यासारखी वाटत असेल बरं? ..कारण दिसायला तर त्या निश्चितपणे माझ्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. श्रीमंत ही आहेत. बाकी मला नरडं आहे त्यांना गळा आहे. मग काय साधर्म्य असेल आमच्या मध्ये ? मग मला कधीतरी वाटलं की कदाचित भाषा प्रभुत्व हे दोघीतलं साम्य असेल का?” असा सवाल विचारला आहे.
अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतलेली मुलाखत आणि त्यात त्यांचा उडालेला गोंधळ यावर देखील यावेळी अंधारेंनी भाष्य केलं आहे. अंधारे म्हणतात,”कालची मुलाखत आणि त्यातलं त्यांचं कॉन्टिनेन्टल उच्चारात मराठी ऐकलं अन् खात्री पटली की आमच्यात साम्य असे काहीच असु शकत नाही. पण त्याहीपेक्षा मराठी मनाचे मानबिंदू असणारे, मराठी भाषेचे पाईक, मराठी वाचवाचा ध्यास घेणारे, वेळप्रसंगी मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉची पुस्तके सुध्धा मराठीत व्हावीत यासाठी कृष्णकुंजचे रान हादरवणारे राजदादा यांना, मी बोल्ली, मला चान्स मिळाली, या टाईपच मराठी ऐकुन कानात शिसं ओतल्यासाखं झालं असेल” असा टोला देखील यावेळी अंधारेंनी लगावला.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस नेमकं
एका मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या मला आधी सुषमा अंधारे माझ्यासारख्या वाटायच्या कारण त्या स्पष्टवक्त्या होत्या. मनात येईल तेच त्या बोलायच्या कोणाला घाबरत नव्हत्या. परंतु आता एक बदल झाला आहे. त्यांना येईल तीच स्क्रिप्ट त्या बोलतात. आज त्यांच्या चेहऱ्यावर मास्क आहे. आधी ज्या त्या होत्या.. त्या आता नाहीयेत आता त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं देखील अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या होत्या.