अमिताभ यांचा संयम सुटला अन् रेखांसोबतची प्रेमकथा माध्यमांपर्यंत पोहोचली…

” अमिताभ बच्चन यांनी स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी तसे केले. त्यांची पत्नी, मुले यांच्या रक्षणासाठी त्यांनी तसे केले. आणि त्यांनी तसे का करू नये? त्यांचे माझ्यावर आणि माझे त्यांच्यावर प्रेम आहे. बस्स! त्याची जगाला माहिती असण्याची काही गरज नाही. जर त्यांनी खासगीत त्यांचे आणि माझे संबंध नाकारले असते, तर मात्र मी खूप निराश झाले असते “.
रेखा, फिल्मफेअरला दिलेली मुलाखत

 

अमिताभ बच्चन आणि रेखा. बॉलिवुडमधील एकरूप झालेली जोडी. इतके एकरूप की आजही त्यांचे नक्की काय आहे, याचा कोणाला थांगपत्ता लागलेला नाही. रेखा लौकिकदृष्ट्या आता सिंगल आहेत. मात्र त्या आजही मांगमध्ये सिंदूर घालतात. का? या प्रश्‍नापाशी बरेच जण घुटमळलेले. अजुनही घुटमळतात. मात्र कोणाला त्याचे उत्तर मिळालेले नाही.

अभिनेता पुनीत इस्सरची पत्नी दिपाली हिने एकदा गौप्यस्फोट केला. रेखांचे ते सिंदूर बीग बींसाठी असल्याचे तिने म्हटले होते. मात्र थोडी खळबळ माजण्या व्यतिरिक्त फार काही झाले नाही. कदाचित बॉलिवुडला आणि त्यांच्या चाहत्यांनाही ते अपेक्षितच असावे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा नाही.

रेखा यांना एका मुलाखतीत पत्रकारांनी याबाबत छेडले होते. तेव्हा मी ज्या ठिकाणाहून आली आहे, तेथे असे सिंदूर घालण्याची पध्दत असल्याचे त्या म्हणाल्या. शिवाय ते आपल्याला सुट होते असा दावाही त्यांनी केला. मात्र त्यांच्या या बोलण्यातून अमिताभ यांच्याशी त्यांच्या असलेल्या किंवा नसलेल्या संबंधांवर कोणता प्रकाश पडला नाही.

या दोघांचे प्रेम हे अजुनही न उलगडलेले कोडे आहे. एक मिस्टरी म्हणता येईल या सदरात ते मोडते. त्याची वाच्यता त्यांनी कधी केली नाही. वाच्यता करणाऱ्यांना फार काही ठोस सांगता आले नाही कारण काही ठोस त्यांच्या हाती लागलेच नाही.

पण या लव्ह स्टोरीला सुरूवात सत्तरच्या दशकात झाली. दो अंजाने हा 1976 मध्ये आलेला चित्रपट. त्यावेळी ते प्रेमात पडले. पॅशनेट लव्ह स्टोरी म्हणतात तसली ही प्रेमकथा. किमान दावा तसा केला जातो. मात्र सगळेच गुपचूप. त्याला कारण बच्चन यांची कौटुंबिक पार्श्‍वभूमी. त्यांच्या कुटुंबाला साहित्य आणि राजकीय क्षेत्रात असलेली एक प्रतिष्ठा. त्यात त्यांचे विवाहीत असणे.

रेखा यांच्या एका फ्रेंडचा बंगला होता. तेथे त्यांच्या भेटी व्हायच्या. जाहीरपणे मात्र एक सुरक्षित अंतर त्यांनी कायम राखलेले. पण एक किस्सा घडला. अमिताभ बच्चन यांचा संयम सुटला अन ही प्रेमकथा माध्यमांपर्यंत पोहोचली.

गंगा की सौगंध (1978) या चित्रपटाचे शूटींग सुरू होते. त्यात अर्थातच हे दोघे होते. मात्र एक अन्य कलाकार रेखा यांच्याशी सेटवर गैरवर्तन करत होता. ते अमिताभ यांना मानवले नाही. त्यांचा संयम सुटला आणि ते त्या कलाकारावर भडकले. अमिताभ- रेखा संबंध असे उघड झाले.

दोघांचे परस्परांवर प्रेम होते. मात्र त्याची वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी कधीही जाहीर वाच्यता केली नाही. त्याला कारण अमिताभ यांचा जया यांच्याशी विवाह झाला होता. मात्र रेखा यांना पत्नीचा दर्जा हवा होता. त्यांना पती, पत्नी और वो मधली वो व्हायचे नव्हते. पण अमिताभ यांनी आपले खासगीपण जपले होते.

स्वत: रेखा याबाबत सांगतात की अमिताभ काहीसे ओल्ड फॅशन्ड आहेत. त्यांना कोणाला दुखवायची इच्छा नसते. तसे त्यांच्याकडून होत नाही. त्यांच्या पत्नीला ते कसे दुखावतील?

एका प्रथितयश मासिकाने बच्चन हे द ग्रेट अमिताभ बच्चन झाल्यावर त्यांची मुलाखत घेतली होती. यावेळी कोणता आडपडदा न ठेवता त्यांना रेखाजींशी असलेल्या कथित संबंधांबाबत थेट प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावेळी आपले असे काही संबंध असल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. विशेष म्हणजे ही बाब जेव्हा रेखा यांच्या निदर्शनास आणण्यात आली तेव्हा त्यांनी बच्चन यांनी तसे का करू नये? असा उलट प्रश्‍नच मुलाखतकर्त्याला विचारला होता.

रेखा-अमिताभ संबंधांच्या चर्चेला गंगा की सौगंध नंतर पाय फुटले. त्यात कुठेतरी रेखा यांनीही हातभार लावला. अभिनेते ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात झालेला हा किस्सा.

रेखा त्या लग्नसोहळ्याला आल्या होत्या. त्यांच्या नेहमीच्या पध्दतीने त्या पूर्ण नटलेल्या होत्याच. मात्र त्यांनी मांगमध्ये सिंदूर भरला होता. ही बाब कोणाच्याही नजरेतून सुटण्यासारखी नव्हतीच. इतकेच नाही, तर दुल्हन अर्थात नीतू यांना भेटल्यानंतर रेखा थेट अमिताभ बच्चन यांच्याकडे गेल्या. त्यांच्याशी त्यांनी गप्पा मारल्या.

जया बच्चनही या सोहळ्याला हजर होत्या. त्या चित्रपटात जसा काही दृश्‍यांत निर्विकार चेहरा करतात अगदी तसाच चेहरा करून त्या तेथे उपस्थित होत्या. मात्र अखेर त्यांचाही बांध फुटला. त्यांनी मान खाली घातली अन अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

प्रकाशित झालेला आणि प्रचंड चर्चिला गेलेला हा किस्सा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जया यांनी रेखा यांना आपल्या घरी बोलावले होते. दोघीच होत्या. बराच वेळ चर्चा झाली. वातावरणात एक अस्वस्थता होती. काहीसा तणाव आणि अवघडलेपण सुध्दा. मात्र काहीही झाले तरी मी माझ्या पतीला सोडणार नाही असा निर्वाणीचा आणि ठाम निर्णय जया यांनी त्यावेळी दिल्याचे म्हणतात.

त्या निश्‍चयावर आजही त्या ठाम आहेत. बच्चन यांच्या खासगी जिवनात किंवा व्यावसायिक जिवनात अनेक वादळे आली, त्यांच्या अस्तित्वाचाही प्रश्‍न निर्माण झाला. मात्र जया किंचितही विचलीत न होता, त्यांच्यासोबत उभ्या राहील्याचे सगळ्यांनी पाहिले. किमान तसे भासवले जरी गेले असावे असे मान्य केले तरी बच्चन यांच्या आयुष्यात जे स्थान त्यांना मिळाले, ते त्यांनी सोडले नाही. त्यांना सोडावे लागले नाही. त्यांनी ते सोडावे याकरता प्रयत्न जरी झाले असले तरी त्यात कोणाला यश आले नाही.

अमिताभ रेखा प्रकरणाला साक्षात यश चोप्रा यांनीही दुजोरा दिलेला. यशजींच्या सिलसिला या चित्रपटात बच्चन, रेखा यांच्यासोबतच शशी कपूर आणि जया बच्चन व संजीव कुमार अशी तगडी स्टार कास्ट होती. या चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे प्रेम आपल्या सर्वोच्च शिखरावर होते. जया यांनाही त्याची कल्पना होती. सिलसिलाची स्टोरी लाइन काहीशी अशीच होती.

शूटींगच्या वेळी सतत तणावात असायचो. जे रिअल लाइफमध्ये सुरू होते, तेच रील लाइफमध्ये आम्ही दाखवत होतो अशा आशयाची टीप्पणी खुद्द यश चोप्रा यांनीच दिली.

पडद्यामागे या दोघांचे काय आणि कसे संबंध होते याचे गुढ आजही कायम आहे. या दोघांचे आजही संबंध असल्याचा दावाही केला जातो. मात्र पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री अभूतपूर्व अशीच होती. किंबहुना ज्या चित्रपटांचे नायक बच्चन नव्हते, व चित्रपट नायिकाकेंद्रीत होता, अशा चित्रपटांत रेखा यांचा अभिनय पाहुन आपण कुठेतरी बच्चन यांनाच पाहत असल्याचा भासही होतो. कदाचित यामुळेच मध्यंतरीच्या काळात इतर अनेक विशेषणांप्रमाणे लेडी अमिताभ हे आणखी एक विशेषण रेखा यांना चिकटले.

त्यांना महानायकाची पत्नी व्हायचे होते. महानायकालाही कदाचित त्यांच्या आयुष्यात या नायिकेचे स्वागत करायचे होते. मात्र त्यांची भेट उशीरा झाली. कदाचित बच्चन यांच्या बाबूजींचे संस्कार, कुटुंबव्यवस्थेवर असलेली त्यांची श्रध्दा आणि त्यामुळे मनावर आणि वर्तणुकीवर िंबंबवल्या गेलेल्या मर्यादा यामुळे हे दोन महान कलाकार रिअल लाइफमध्ये एकत्र आले नाहीत.

मात्र रिल लाइफमध्ये हजारो, लाखो, कोट्यवधी प्रेक्षकांनी या जोडीवर आपल्या प्रेमाची मोहोर उमटवली होती. त्यांना बॉक्‍स ऑफिसवर यश देउन त्याची प्रचितीही दिली होती.

” रेखा यांना वो म्हणून अमिताभ यांच्या आयुष्यात राहायचे नव्हते. तर रेखा यांच्यासाठी पत्नीला दुखावण्याची अथवा सोडून देण्याची अमिताभ यांची इच्छा नव्हती. अशात आपल्या या नात्याला काहीच भविष्य नाही याची जाणीव रेखा यांना झाली होती. सिलसिला नंतर त्यांच्या प्रेमाचा हा सिलसिला तेथेच थांबला असे मानता येउ शकते. मात्र तरीही या प्रेमकथेची मिस्ट्री अजुनही कायम आहे. कारण दोघांनी ना तेव्हा काही सांगितले होते ना आज काही सांगायची त्यांची इच्छा आहे “.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.