मुंबई : राज्यात कोरोना काळात आलेल्या वाढीव वीजबिला वरून चांगलेच राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. त्यातच आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये क्लार्कचे काम करावे असा खोचक सल्ला विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महावितरणच्या कार्यालयात क्लार्कचं काम करावं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे बिलं घेऊन तपासणीसाठी येतो. असा खोचक टोला प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.
भाजपा नेत्यांनी वीज बिलं घेऊन माझ्या कार्यालयात यावं मी ती बिलं तपासून पाहिन असं नितीन राऊत यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. वाढीव वीज बिलं नसतील तर आम्ही सगळी बिलं भरु असं प्रॉमिस त्यांनी करावं असंही ते म्हणाले होते. आता त्यांना भाजपाच्या प्रविण दरेकरांनी खोचक टोला लगावला आहे.
कोरोनाकाळात अवाजवी वीजबिल आल्यानंतर त्यात काही प्रमाणात सवलत देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. मात्र मागील आठवड्यात वाढीव वीजबिलामध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचे तसेच जे बिल आले आहे ते नागरिकांना भरण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यावरून एकाच कलगीतुरा निर्माण झाला आहे.