पुणे – लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत ब्रेक घेतल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून पुन्हा एकदा मनसेचा उमेदवार लढणार आहे. त्यासाठी पक्षाने कंबर कसली असून, मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
दरम्यान, अमित ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी प्रभागनिहाय आढावा घेतला. तसेच पक्षाकडून उमेदवाराची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, 2007 मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर पक्षाकडून 2009 मध्ये रणजित शिरोळे यांनी, तर 2014 मध्ये दीपक पायगुडे यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसेने 2019 मध्ये लोकसभेसाठी उमेदवार दिलेला नव्हता.
मात्र, 2024 साठी पक्षाने पुन्हा तयारी सुरू केली असून, त्यासाठी पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांकडून तिकिटाची मागणी करण्यात आली आहे. यात माजी गटनेते वसंत मोरे, विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर, ऍड. किशोर शिंदे, गणेश सातपुते, राजेंद्र (बाबू) वागसकर इच्छूक आहेत. तर पक्षानेही पुण्यावर लक्ष केंद्रीत केले असून, सातत्याने बैठका सुरू आहेत. अमित ठाकरे यांचेही नियमित दौरे सुरू आहेत.
तीन निवडणुकांची जबाबदारी
लोकसभेनंतर विधानसभा आणि त्यानंतर अपेक्षित मनपा निवडणुकांची तयारी या निमित्ताने मनसेकडून सुरू आहे. या तीनही निवडणुकांची जबाबदारी अमित ठाकरेच सांभाळणार आहेत. त्यासाठी प्रभागनिहाय माहिती, पक्षाची रचना, यापूर्वीच्या महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे बलाबल, पक्षसंघटना याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. अमित ठाकरे स्वत: ही माहिती जाणून घेत आहेत.