पिंपरी – शहरातील इमारतींच्या बांधकामांद्वारे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सर्व बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असून निर्देशांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पालिका हद्दीतील 70 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींचे बांधकाम सुरू असणाऱ्या प्रकल्पांना 35 फूट उंच मेटल शीट लावावे, 1 एकर पेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडामध्ये बांधकाम चालू असल्यास भूखंडाच्या भोवती 35 फूट मेटल शीट व 1 एकर पेक्षाकमी क्षेत्राच्या भूखंडासाठी 25 फूट उंच मेटलशीट लावणे, बांधकाम सुरू असणाऱ्या सर्व इमारतींना व बाजूने हिरवे कापड अथवा ज्यूट शीट ताडपत्रीने झाकणे बंधनकारक आहे. पाडकाम सुरू असताना बांधकाम हिरवे कापड, ज्यूट शीट कव्हर, ताडपत्रीने झाकलेली असावीत. बांधकाम पाडताना त्यावर पाणी फवारणे आवश्यक. काम सुरू असताना त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य लोडींग अनलोडींग दरम्यान वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी. सर्व बांधकाम साहित्यावर हवेत उडून जाणारे कण असतात जे वायु प्रदूषणास कारणीभूत ठरतील अशा साहित्यावर पाणी शिंपडावे जेणेकरून धुलीकण हवेत पसरणार नाहीत.
सरकारी प्रकल्पानांही निर्देश
सर्व बांधकाम कर्मचारी, व्यवस्थापकांनी मास्क, गॉगल्स, हेल्मेट वापरावे., पूल, उड्डाणपूल सुरू असणाऱ्या बांधकामाच्या बाजूने 25 फुटाचे बॅरीकेडींग करणे बंधनकारक., जमिनीवर सुरू असणाऱ्या सर्व मेट्रोच्या कामांवर 25 फूट उंचीचे बॅरीकेडींग तसेच बांधकामाची जागा हिरवे कापड, ज्यूट शीट, ताडपत्रीने झाकणे बंधनकारक, बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी ट्रॅकींग सिस्टीम असलेल्या वाहनांचा वापर करावा. माती, वाळू, बांधकाम साहित्य हे नेमून दिलेल्या जागेतच टाकाव्यात. मोकळ्या जागेवर, सार्वजनिक रस्ते, फूटपाथवर बांधकाम साहित्य टाकल्यास दंडात्मक कारवाई, कचरा उघड्यावर जाळण्यावर पूर्णपणे बंदी., अशा विविध सूचना दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना म्हाडा, एमआयडीसी, पीएमआरडीए, एसआरए, रेल्वे आदींमार्फत सुरू असणाऱ्या कामांना देखील अनिवार्य असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
बांधकाम सुरू असलेल्या कामातील राडारोडा साहित्य पालिकेच्या मोशी येथील सी ऍन्ड डी वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पामध्ये अनलोडिंग करण्यात यावा. त्यानंतर वाहन पूर्णपणे धुवून स्वच्छ करावे. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने जारी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी न केल्यास संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
मकरंद निकम, शहर अभियंता