अमित शहा यांच्या एक देश, एक भाषा वक्‍तव्यावरून नव्या वादाला सुरूवात

हा इंडिया आहे, हिंदिया नव्हे : स्टॅलिन यांनी व्यक्‍त केला संताप

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्याने तीच देश एकसंध ठेवू शकते, असे वक्तव्य त्यांनी केले. एक देश, एक भाषा असा संकेत दिल्याने नव्या वादाला सुरूवात झाली आहे. शहा यांच्या विधानाचे दक्षिणेकडील राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले असून तमिळनाडूतील विरोधी पक्ष डीएमकेचे नेते एम.के.स्टॅलीन यांनी हा इंडिया आहे, हिंदिया नव्हे, अशा शब्दात अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. तसेच, अमित शहा यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणीही स्टॅलीन यांनी केली. याशिवाय, शहा यांच्या हिंदीबाबतच्या वक्तव्यावरून कर्नाटकमध्येही राजकीय वादळ उठले आहे.

हा इंडिया आहे, हिंदिया नव्हे, हिंदीच्या वर्चस्वामुळे अनेक राज्ये त्यांचे कायदेशीर अधिकार गमावू शकतात. सोमवारी यासंदर्भात पक्षाची उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, त्यानंतर याबाबत काय पावले उचलायची याची आखणी केली जाईल. पण, ज्या राज्यांच्या कायदेशीर अधिकारांवर हिंदीच्या वर्चस्वामुळे गदा येऊ शकते अशा सर्व राज्यांना एकत्र आणण्यामध्ये आम्हाला अजिबात संकोच वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया स्टॅलिन यांनी दिली. तसेच, हिंदीबाबत केलेले वक्तव्य राष्ट्रीय ऐक्‍य आणि अखंडतेसाठी हानिकारक आहे त्यामुळे अमित शहा यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणीही स्टॅलीन यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. याशिवाय तमिळनाडूतील सत्ताधारी एआयएडीमके पक्षाचे नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री के. पाडिंयाराजन यांनी, केंद्र सरकारने हिंदीची एकतर्फी सक्ती केली तर केवळ तमिळनाडूच नव्हे, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, आणि आंध्र प्रदेशातही तीव्र प्रतिक्रिया उमटतील, पाठिंबा मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.