सीएनजी किट अनुदानासाठी मागविले अर्ज

डीबीटीद्वारे मिळणार पैसे : प्रती रिक्षा 12 हजारांचे अनुदान

पुणे – सन 2014 पूर्वी आरटीओ रजिस्ट्रेशन झालेल्या प्रवासी ऑटोरिक्षांना सीएनजी किटसाठी 12 हजार रुपयांचे अनुदान महापालिका प्रशासन देते. पालिकेच्या 2019-20 या वर्षाच्या अंदाजपत्रकातही या योजनेसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रशासनाने रिक्षाधारकांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. हे अर्ज करण्याची मुदत 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे.

शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. यात गेल्या सात वर्षांत सुमारे 16 हजार रिक्षांना हे अनुदान महापालिकेने दिले आहे. महापालिकेकडून 2012 पासून हे अनुदान देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

तर 2014 पासून सर्व नवीन रिक्षांना सीएनजी कीट बंधनकारक असल्याने नवीन रिक्षांना हे अनुदान दिले जात नाही. पर्यावरण विभागाकडून ही योजना राबविण्यात येते. त्यासाठी या वर्षीही पालिकेकडून वलीं.र्िीपशलिीीेरींळेप.ीेस या संकेतस्थळावर हे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार, या वर्षीही रिक्षाधारकांना ही अनुदानाची रक्कम थेट बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे.

ही कागदपत्रे आवश्‍यक

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रिक्षाधारकांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, रिक्षा परमिट, सीएनजी किट बसविल्याचे प्रमाणपत्र, रिक्षाचे योग्यता प्रमाणपत्र, रिक्षा चालविण्याचा परवाना, पीयूसी प्रमाणपत्र, आधार कार्ड, परमिटधारकाचे बॅंक खाते माहिती, परमीट धारकाचा फोटो ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.