पुणे – साधूच्या वेशात येऊन अमली पदार्थ विकणाऱ्यास केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) अटक केली आहे. त्याच्याकडून 680 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. त्याची किंमत बाजारात 3 लाख 40 हजार रुपये आहे. धनकवडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मणी महेश गिरी (रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. धनकवडीतील शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ साधूसारखी वेशभूषा केलेला एक व्यक्ती थांबला असून त्याच्याकडे चरस नावाचा अमली पदार्थ असल्याची माहिती कस्टमच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.
त्यानुसार पथकाने तेथे सापळा लावला. या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने त्याचे नाव सांगितले. नाशिकहून तो पुण्यात चरस विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती दिली. त्याच्याकडून चरसची खरेदी करणाऱ्या व्यक्तीची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती कस्टमच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली. गिरीला अटक करण्यात आली असून त्याला कस्टमच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.