नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विविध सर्वे केले जात आहेत. पंतप्रधान म्हणून कोणाला सगळ्यांत जास्त पसंती असेल असाही सर्वे काही दिवसांपूर्वी झाला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच अजूनही लोकांची पसंती असल्याचा दावा सर्वेक्षण करणाऱ्यांनी आकडेवारीच्या आधारावर केला. मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची आपली आकांक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे जर पुन्हा भारतीय जनता पार्टीला अथवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळालेच तर मोदी हेच पंतप्रधान राहणार यात शंका नाही. मात्र जर रालोआला किंवा भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर कोण, हा प्रश्न घेऊन आता एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यात मोदी यांच्यानंतर त्यांचे कट्टर सहकारी आणि अत्यंत विश्वासातले नेते अमित शहा यांना पसंती देण्यात आली आहे.
मोदींचे उत्तराधिकारी कोण असावेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात सध्या गृहमंत्री असलेले अमित शहा यांचे नाव होते. त्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या नेत्यांचीही नावे पर्याय म्हणून समोर ठेवण्यात आली होती. यातील शहा यांच्या नावाला अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. 29 टक्के लोकांनी शहा यांच्या बाजूने कौल दिला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या बाजूने 26 टक्के लोकांनी तर नितीन गडकरी यांच्या बाजूने 15 टक्के लोकांनी कौल दिला आहे.
्रअमित शहा सध्या देशाचे गृहमंत्री आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हापासून ते मोदी यांच्यासोबत आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच भाजपची देशात बहुमताने सत्ता आली आहे. भाजपला उत्तर प्रदेशात जे एकतर्फी यश मिळाले त्यात शहा यांच्या रणनीतीचा मोठा वाटा असल्याचे मानले आणि म्हटले जाते. मोदी यांच्या अगदी खास मर्जीतील ते नेते आहेत आणि मोदी यांच्यावर अटल श्रध्दा असणाऱ्या नेत्यांमध्ये शहांचा समावेश होता. त्यामुळे सर्वेक्षणात त्यांना झुकते माप मिळत असल्याचे दिसते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या राज्यात लोकप्रिय आहे. या राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे. कट्टर हिंदुत्ववादी नेते अशी प्रतिमा असलेल्या योगींनी गेल्या काही काळात राज्यातील माफियांचा सफाया करण्याचा धडाका लावल्यामुळे त्यांची लोकप्रियात एका विशिष्ट वर्गात झपाट्याने वाढली आहे. बुलडोझर बाबा म्हणूनही त्यांची ओळख प्रस्थापित झाली आहे. मोदींचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना दुसऱ्या पसंतीची मते मिळाली आहेत. त्यांच्यात आणि शहा यांच्यात फारसे अंतर नाही.
भाजपचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते नितीन गडकरी यांना राज्यात रोडकरी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कामाचा झपाटा अवाक करणारा आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात राहुनही आपली वेगळी ओळख रूजविण्यात यशस्वी झालेले आणि मोदींच्या सावलीबाहेर दिसणारे गडकरी आज एकमेव मंत्री आणि नेते आहेत. भाजपमध्ये त्यांना मानणारा वर्ग आहेच, मात्र इतर पक्षांतही गडकरी यांचे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. गडकरी यांच्या या जमेच्या बाजू आहेत. बहुमताच्या खेळात भाजप कमजोर पडला तर गडकरी यांना पहिली पसंती मिळू शकते. मात्र त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांच्यावर काही गंभीर आरोप झाले होते. आताही नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅगने त्यांच्या खात्यावर काही ठपके ठेवले आहेत. भविष्यात या बाबी गडकरी यांना अडचणीच्या ठरू शकतात.
मोदी यांनी निवृत्तीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. मात्र तरीही त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जातो आहे. त्याची खरेच गरज पडली तूर्त तरी भाजपमध्ये या तीनच चेहऱ्यांचा विचार होऊ शकतो. अन्य नेते त्यांच्या जवळपासही नाहीत.