महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे सध्या पक्ष संघटनेमध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळतंय. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सध्या अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान त्यांची केंद्रीय मंत्री नारायण यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्याशी भेट झाली. राणे यांच्या घरी झालेली भेट सुमारे अर्धा तास चालली.
राणे ठाकरे भेटीनंतर मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राणे ठाकरे ही भेट केवळ योगायोग आहे की राजकारणातील पुढील एखादे समीकरण याबाबतच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत. नितेश राणे यांनी स्वतः अमित ठाकरेंच्या स्वागताचा फोटो ट्विट करत या भेटीबाबत माहिती दिली आहे.
‘आम्ही भगवाधारी’ या कॅप्शन खाली ट्विट केलेल्या फोटोमध्ये नितेश राणे हे अमित ठाकरेंचं स्वागत करताना दिसत आहे. यावेळी अमित ठाकरेंच्या खांद्यावर एक भगवी शाल तर हातात पुष्पगुच्छ आहे. राणेंच्या कणकवलीच्या घरातील हा फोटो आहे. या फोटामुळे मात्र राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.
आम्ही भगवाधारी !! pic.twitter.com/cOrhAEsyvl
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) July 6, 2022
या भेटीनंतर अनेक राजकीय प्रश्न उपस्थित होत होते त्यावर स्वतः नितेश राणेंनी उत्तर दिलय. नुसत्या शुभेच्छा देण्यासाठी आणि कौटुंबिक चर्चा होती, बाकी काही नाही. आम्ही वर्षानुवर्ष लहानपणी एकत्र खेळलेलो आहे. वर्षानुवर्षांचे संबंध आहेत. त्यामुळे केवळ कौटुंबिक आणि मित्र म्हणून आमच्यात चर्चा झाली असल्याची माहिती राणे यांनी माध्यमांना दिली.