अमेठीमध्ये स्मृती इराणींच्या कार्यकर्त्याची हत्या

अमेठी – उत्तर प्रदेशात अमेठी मतदार संघामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात विजय मिळवणाऱ्या स्मृती इराणी यांच्या प्रचारातील भाजपच्या एका कार्यकर्त्याची आज दोन बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही राजकीय हत्या असल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. सुरेंद्र सिंह असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. बारामुलिया गावाचे ते माजी प्रमुख आहेत. काल सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांना लखनौमधील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले, असे अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक दया राम यांनी सांगितले.

सुरेंद्र सिंह यांचे काही व्यक्‍तींशी जुने वैर असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय या हत्येमागे राजकीय वैमनस्य असल्याचेही तपासले जात आहे. या हत्येसंदर्भातील महत्वाचे धागेदोरे मिळाले असल्याचे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओम प्रकाश सिंह यांनी सांगितले.

या हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. इलेक्‍ट्रॉनिक देखरेखीद्वारे काही महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. पुढील 12 तासात या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असा विश्‍वासही डीजीपी सिंह यांनी व्यक्‍त केला.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी तीव्र दुःख व्यक्‍त केले आहे. सिंह हे कष्टाळू आणि निष्ठावान कार्यकर्ते होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी स्मृती इराणी यांच्यावर रहिवाशांना बूटांचे वाटप केल्याचा आरोप केला होता. राहुल गांधी यांचा अवमान करण्यासाठीच इराणी यांनी बूट वाटले असा आरोप प्रियांका यांनी केला होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×