दखल: कॉंग्रेस-राष्ट्रवादीच मतांपासून “वंचित’

हेमंत देसाई

लोकसभा निवडणुकीत देशात आणि महाराष्ट्रात विरोधकांची पुरती वाट लागली. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा खुर्दा उडाला. या निवडणुकीत महायुतीविरोधी आघाडीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने 56 छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेतले होते, असे छातीठोकपणे सांगितले गेले. मोदींची 56 इंचांची छाती असेल, तर आमचीसुद्धा ती तशी आहे, हे दाखवण्याचाच हा केविलवाणा प्रयत्न होता. ज्या पक्षांचे नावही कधी ऐकले नाही आणि त्यांना घरातलेही मत मिळण्याची शक्‍यता नाही, अशांना बरोबर घेऊन काय उपयोग? प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपल्याबरोबर यावे, असा प्रयत्न कॉंग्रेस-राष्ट्रवादीने केला, परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही.

वंचित ही भारतीय जनता पक्षाची बी टीम असण्याची शक्‍यता असेल कारण संपूर्ण प्रचारात भाजपने या आघाडीवर एकही वार केला नाही. उलट त्यांना सुप्त बळ पुरवले असल्याचा संशय असून, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पराभवास वंचित मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे. औरंगाबाद या आंबेडकरी चळवळीच्या केंद्रात वंचित बहुजन आघाडीने एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना उभे केले आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केला. तेथे कॉंग्रेस उमेदवाराची अनामत रक्‍कम जप्त झाली. खैरे यांच्या काळात औरंगाबाद शहरात बजबजपुरी माजली, हे पटवून देण्यात वंचितला यश आले. मुस्लिम व आंबेडकरवाद्यांनी एकजुटीने जलील यांच्यासाठी काम केले. त्यात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा फॅक्‍टरचा उपयोग करून मतविभाजन घडवले. जलील यांच्यासारखा सुशिक्षित पुढारी लोकांनी पसंत केला. जवळपास आठ ते दहा मतदारसंघांत वंचितने मोठ्या प्रमाणात मते घेतल्याने, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना त्याची झळ पोहोचली.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून दारुण पराभव पत्करावा लागला. चिखलीकर यांना 50 हजारांची आघाडी होती. वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाख मते घेतल्यामुळे चव्हाणांचा बोऱ्या वाजला. वंचितचे शिल्पकार प्रकाश आंबेडकर यांचा सोलापूर व अकोला या दोन्ही मतदारसंघांत पराभव झाला. परंतु आपण विजयी होऊ, याची त्यांना खात्री असेल, असे वाटत नाही. सोलापुरात माझ्याविरुद्ध उभे राहू नका, असे कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी आंबेडकरांना वारंवार सांगूनही त्यांनी ऐकले नाही.

आंबेडकरांनी दीड लाख मते घेतल्यामुळे, मतविभाजनात भाजपचे सिद्धेश्‍वर महाराज यांनी बाजी मारली. त्यामुळे शिंदे यांच्या शेवटच्या निवडणुकीतच त्यांचा पराभव झाला. आता गंमत अशी की सोलापुरात कॉंग्रेसचे स्थान तिसरे आहे. त्यामुळे तेथे सुशीलकुमार यांच्यामुळे माझा पराभव झाला, असे आंबेडकर म्हणू शकतात.
बुलडाण्यात वंचित आघाडीचे बाळासाहेब शिरसकर यांनी दीड लाख मते घेतल्याने राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे आडवे झाले. तेथे शिवसेनेचे प्रताप जाधव जिंकून आले.

गडचिरोलीत वंचितने लाखाच्या वर मते खाल्ल्यामुळे, कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी पडले. तेथे भाजपचे अशोक नेते यांनी यश मिळवले. हिंगोली मतदारसंघात वंचितच्या मोहन राठोड यांनी सव्वा लाख मते खेचल्यामुळे कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे आपटले. तेथे शिवसेनेच्या हेमंत पाटील यांनी विजय मिळवला. परभणीतही अलगीर खान यांनी एक लाख मते घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या राजेश विटेकर यांना विजय मिळता मिळता राहिला. तेथे शिवसेनेचा फायदा झाला. सांगलीत तर वंचितचे उमेदवार आणि मराठी चित्रपटांचे नायक गोपीचंद पडळकर यांच्यामुळे स्वाभिमानीच्या तिकिटावर वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना हरवण्यात आले. यवतमाळ, हातकणंगले, अमरावती, लातूर या मतदारसंघांतही वंचितने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. राज्यात वंचितचा एकच उमेदवार निवडून आला असला, तरी सुमारे दहा मतदारसंघांत त्यांनी लक्षणीय मते घेतल्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत साठ मतदारसंघांवर वंचितचा प्रभाव पडू शकतो.

दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव प्रकरण घडल्यानंतर, त्याचा राजकीय फायदा उठवण्यात प्रकाश आंबेडकर यशस्वी झाले. संभाजी तथा मनोहर भिडेंविरुद्ध त्यांनी मोहीमच चालवली. रा. स्व. संघाला घटनेच्या चौकटीत आणा, अशी अट घालून त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु या पक्षांनी ती मागणी मान्य करून बोलणी सुरू ठेवली. परंतु वाटाघाटी करताना कॉंग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांना झुलवत ठेवणे, आज मला वेळ नाही, उद्या भेटू असे म्हणणे, हे आंबेडकरांनी सुरू ठेवले. तसेच, तुम्हाला काहीही अधिकार नाही, दिल्लीतच सगळे ठरते. मग तुमच्याशी बोलून उपयोग काय, अशी जाहीर टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या तर ते विरोधातच आहेत. यावरून भाजपने त्यांचा उपयोग करून घेतला, असे मानायला जागा आहे, असे म्हटले तर आंबेडकरांना त्याचा राग येतो. मात्र तरीही या निवडणुकीत वंचित आघाडीने आपली ताकद मोठी आहे, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने नमते घेतले, तरच त्यांचा फायदा आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितने खूप जागा मागितल्या. तेवढ्या त्या दिल्या असत्या, तर आम्हाला लढवायला जागाच उरल्या नसत्या, असे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतर्फे सांगण्यात येते. परंतु या दोन पक्षांची ताकद मर्यादित झाली असून, या बदलत्या वास्तवाचा विचार त्यांना करावाच लागेल. तेव्हा विधानसभेत वंचितला जास्त जागा देण्याची तयारी दर्शवावी लागेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतर्फे नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा गजर केला जातो. परंतु हे पक्ष प्रामुख्याने मराठा जातीच्या उमेदवारांनाच तिकिटे देतात आणि छोट्या जातीच्या उमेदवारांची उपेक्षा करतात, ही आंबेडकरांची टीका योग्यच आहे. वंचितच्या प्रभावामुळे तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपला चेहरा बदलला, तर ते बरे होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.