दोहा: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी सोमवारी अफगाणिस्तान सरकारला मदत कमी केली. अफगाणिस्तानमधील प्रमुख नेत्यांमधील अध्यक्षपदावरून असलेले मतभेद दूर करण्यात त्यांना अपयश आले. तालिबानबरोबरच्या शांतता कराराच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी काबुलमध्ये ते आले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान कतारला थांबून त्यांनी तालिबानी नेत्यांचीही भेट घेतली.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ घनी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यात समझोता न होऊ शकल्याबद्दल पॉम्पेओ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात आलेल्या अपयशामुळे अमेरिका-अफगाण संबंधांचे नुकसान झाले आहे. दुर्दैवाने, अफगाण, अमेरिकन आणि युतीतील त्या बलिदान देणाऱ्या भागीदारांचा अनादरही झाला आहे. अफगाणिस्तानसाठी नवीन भविष्य घडवण्यासाठी केलेल्या संघर्षाचाही हा अवमान आहे.’ असे निराशावादी उद्गार पॉम्पेओ यांनी व्यक्त केले.
अमेरिका तातडीने 1 अब्ज डॉलर्सची मदत कमी करत आहे आणि 2021 मध्ये आणखी 1 अब्ज डॉलरची मदत कमी केली जाईल. भविष्यात देणगीदारांच्या परिषदेत पाठिंबा काढून घेण्याच्या पुढील योजनांवर अमेरिका विचार करेल.असेही पॉम्पेओ म्हणाले.
अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य माघारी काढून घेण्यावर अमेरिका ठाम आहे. पुढील वर्षभरात 13 हजार सैनिक माघारी घेतले जातील, असे पॉम्पेओ म्हणाले. नंतर पॉम्पेओ यांनी अमेरिकेच्या सैन्याचा तळ असलेल्या कतारच्या अल-उडेद हवाई तळावर एका तासासाठी भेट दिली. येथे मुल्ला बरदार यांच्यासह तीन तालिबान नेत्यांची त्यांनी भेट घेतली.