पॅरिस: जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 4 लाखांजवळ पोहचली आहे. त्यातील 17 हजारहून अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. जगभरात कहर करणाऱ्या कोरोनाच्या हानीचे केंद्र आता चीनऐवजी युरोप खंड बनले आहे.
मागील वर्षीच्या अखेरीस सर्वप्रथम चीनमध्ये करोनाचा संसर्ग आढळला. त्या विषाणूचा फैलाव आता 196 देश आणि प्रदेशांमध्ये झाला आहे. युरोपमधील करोनाबाधितांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्या खंडातील इटली या देशाला तर करोनाने अक्षरश: घेरले आहे. इटलीत आतापर्यंत 6 हजारहून अधिक बळींची नोंद झाली आहे. ती संख्या चीनमधील मृतांच्या जवळपास दुप्पट आहे.
स्पेनमध्ये 2 हजार 696 जण दगावले आहेत. तर फ्रान्समधील मृतांची संख्या 860 इतकी झाली आहे. चीन आणि युरोप व्यतिरिक्त इराणला करोनाचा मोठा तडाखा बसला आहे. त्या देशात 1 हजार 934 जण दगावले आहेत. कोरोनामुळे जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. त्या विषाणूच्या फैलावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाचे ढग घोंघावू लागले आहेत.