आंबेगाव बु.- आंबेगाव खुर्द येथील पुणे महानगरपालिकेचे कै. रखमाबाई तुकाराम थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र अखेर सुरू करण्यात आले आहे. डॉक्टर तसेच अन्य कर्मचाऱ्यांअभावी सदर रुग्णालय बंद होते. परंतु, पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हांकरे यांच्या आदेशानुसार कर्मचार उपलब्ध झाल्यो सदर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहे.
आंबेगाव खुर्द येथील आरोग्य केंद्र गेल्यावर्षी सुरू करण्यात आले होते. यामध्ये केवळ 10 रुपयांत उपचार केले जात असल्याने आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, शनिनगर, दत्तनगर परिसरातील नागरिकांना याचा फायदा होत होता. खासगी हॉस्पिटलचे वाढते दर पाहता सदर आरोग्य केंद्र सर्वसामान्यांसाठी संजीवनी देणारे ठरत आहे.
करोना संसर्गामुळे महानगरपालिकेने शहरात अनेक कोविड सेंटर उभारली आहेत. त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्यामुळे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हांकरे यांच्या आदेशाने एप्रिल महिन्यापासून आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर कोविड सेंटर मध्ये रुजू केले होते. त्यामुळे माहे एप्रिल पासून कर्मचारी नसल्याने येथील आरोग्य केंद्र बंद होते.
यामुळे किरकोळ आजारासाठीही नागरिकांना शहरातील हॉस्पिटलला चकरा माराव्या लागत होत्या. ही बाब लक्षात घेत आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी प्रभाग क्र.40च्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर सदर रुग्यालय सुरू करण्यात आले असून सामान्यांना त्याचा लाभ होत आहे.