अमेझॉनचा भारतातील व्यवसायातील तोटा कमी होत असतानाच आता अमेझॉनने त्यांच्या भारतीय उपकंपन्यांमध्ये 4,473 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी ऑनलाईन मार्केट व्यवसायात 3400 कोटी रुपये तर अमेझॉन पे या पेमेंट प्लॅटफॉर्मच्या व्यवसायात 900 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
अमेझॉन रिटेल इंडिया कंपनीत 172.50 कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. या निधीचा वापर नेमका कशा प्रकारे करण्यात येणार आहे ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. अमेझॉनची स्पर्धक कंपनी फ्लिपकार्टने फ्लिपकार्ट फार्मरमार्ट ही नवी भारतातील कंपनी स्थापन करण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. फ्लिपकार्ट फार्मरमार्ट ही कंपनी भारतात अन्नधान्याच्या किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात काम करणार आहे.
त्यासाठी फ्लिपकार्टने सुरवातील 2,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. हा व्यवसाय विस्तारत जाईल तसे सप्लाय चेन, स्टोरेज, लॉजिस्टिक यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. अन्नधान्याच्या किरकोळ विक्रीच्या व्यवसायात काम करण्यासाठी फ्लिपकार्टची पेरेन्ट कंपनी वॉलमार्टच्या अनुभवाचा आणि तज्ञ मनुष्यबळाचा उपयोग होईल असे फ्लिपकार्ट फार्मरमार्टचे नियोजन आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांचे यापुढील पाऊल किरकोळ अन्नधान्य विक्री म्हणजे किराणामालाच्या क्षेत्रात असल्याने तीव्र स्पर्धा असणार आहे.