मुंबई : सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.
‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या यशामध्ये अल्लू अर्जुनसोबतच एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही वाटा आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस तळपदे आहे. पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयसने त्याचा आवाज दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी श्रेयसवरही कौतुकाचा वर्षाव होत असतांना त्याला अल्लू अर्जुनने त्याच्या कामाची खरी पोचपावती दिली आहे.
श्रेयसचे आभार मानले असून लवकरच तुला भेटेन असं म्हटलं आहे. अल्लू अर्जुन म्हणाला की,”श्रेयस, या चित्रपटासाठी तू जो छान आवाज दिलास त्यासाठी मनापासून तुझे आभार. लवकरच भेटुयात आपण. आज ऑन कॅमेरा मला तुझे आभार मानायचे आहेत. ‘पुष्पा’साठी तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी खूप आभार.”