Shreyas Talpade| मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये यशस्वी कामगिरी करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. विविध भूमिकांमधून तो प्रेक्षकांचे मनं जिंकून घेतो. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांसह कलाकारांनी चिंता व्यक्त केली. मोठ्या कठीण प्रसंगातून त्याने स्वत:ला सावरत पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली. संपूर्ण काळात श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने खंबीरपणे साथ दिली. त्याच्या हेल्थ अपडेटची माहिती देखील त्या वेळोवेळी चाहत्याशी शेअर करत होत्या.
नुकत्याच ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला श्रेयस आणि त्याची पत्नी दीप्तीने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अमेय वाघने श्रेयससाठी एक भावूक कविता सादर केली. यावेळी श्रेयससह प्रेक्षकांचे डोळे देखील पाणावले होते.
“संपले जरी श्वास तरी श्रेयस ते परत घेऊन येईल. श्वास जरी संपले तरी हात होता हाती… कारण, देवासोबत भांडत तिथे त्याची बायको उभी होती. देव म्हणाला जा परत. हिरो म्हणाला काय? आईच्या मनात मायेची, रसिकांच्या मनात प्रेमाची, मुलीच्या मनात ओढीची आणि बायकोच्या मनात साथीची अजून धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे. म्हणून श्रेयस अजून तुझ्या हृदयात धडधड चालू आहे.” अशी भावुक कविता अमेय वाघने सादर केली.
दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाच्या माध्यमातून श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात श्रेयससह गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिकेत असणार आहे. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. यातील श्रेयसच्या भूमिकेचे देखील अनेकांनी कौतुक केले होते.