फलटण – सर्वाधिक दर, वेळेवर पेमेंट यामध्ये आघाडीवर असलेल्या श्रीराम कारखान्यावर बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप सुरु झाले आहेत. त्यात काहीच तथ्य नाही. श्रीराम कारखान्याला अडचणीत आणण्याचाच हा प्रयत्न असून, यामागील बोलविता धनी दुसराच कोणी नाही ना? असा सवाल संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते.
पुढे बोलताना संजीवराजे म्हणाले, आर्थिक गर्तेतून बाहेर पडून श्रीराम सर्वाधिक गाळप, एफ.आर.पी. पेक्षा अधिक ऊस दर आणि वेळेवर पेमेंट, कामगारांचे नियमानुसार पगार, एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न आणि कारखान्यासह अर्कशाळेला पूर्ववैभव प्राप्त करुन देत ऊस उत्पादकांची वाहव्वा मिळवित आहे.
यामुळे विरोधकांची गोची झाली असल्यानेच खोटा प्रचार, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे आरोप सुरु झाले आहेत. मात्र या निमित्ताने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी ऊस उत्पादकांसमोर वस्तुस्थिती मांडणार असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले. प्रतिदिन केवळ एक हजार टन गाळप क्षमतेने सुरु झालेला जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना आता प्रतिदिन 20 हजार टन गाळप क्षमतेपर्यंत पोचविण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, शेतकरी हित हेच उद्दिष्ट ठेवले, त्यांची सक्रिय साथ लाभून श्रीराम उर्जितावस्थेत येत असताना आवाडे दादांवर आरोप करणे गैर व अवाजवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामची बाजारातील पत शून्य होती. कोणतीही वित्तीय संस्था श्रीरामला अर्थसहाय्य करण्यास तयार नव्हती. अशावेळी खासदार शरद पवार आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा कल्लाप्पा आण्णा आवाडे (दादा) यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातून श्रीरामला पूर्ववैभवाप्रत नेण्याचा नवा मार्ग निर्माण करण्यात आला.
दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून तिसरी सहकारी संस्था उभी करुन तिच्या माध्यमातून अवसायानात निघण्यापर्यंत पोहोचलेली संस्था पुन्हा उभी करुन पूर्ववैभवापर्यंत नेण्याची संकल्पना तशी सोपी नव्हती. पण प्रामाणिक प्रयत्न आणि प्रबळ इच्छा शक्ती, सर्वांची साथ याद्वारे ते शक्य झाल्याचे डॉ. शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले. या योजनेनुसार दोन्ही संस्थांमध्ये 15 वर्षांचा भागीदारी करार झाला. त्यानुसार श्रीराम चालविणाऱ्या संस्थेने श्रीरामला मोबदला स्वरुपात पहिली पाच वर्षे गाळप झालेल्या प्रत्येक टनास 100 रुपये, दुसऱ्या पाच वर्षात प्रती टन 110 रुपये आणि तिसऱ्या पाच वर्षात प्रती टन 120 रुपये देण्याचे ठरले होते. त्यावेळी कारखाना संकटात होता. गाळप क्षमता कमी होती. त्यामुळे कामगारांनी 20 टक्के पगार कमी घेतला. बोनस केवळ 8.33 टक्के देण्यात आला. राज्य सहकारी बॅंकेच्या थकीत कर्जाची परतफेड करणे अनिवार्य होते.
त्यामुळे काही प्रमाणात जादा पैसे श्रीरामला मिळाले. मात्र आता दुसऱ्या 15 वर्षांच्या करारात कामगार पगार कपात तर नाहीच उलट नियमानुसार वेतन वाढीप्रमाणे जादा पगार द्यावे लागतील. बोनस 8.33 टक्के नव्हे तर आता इतरांप्रमाणे कदाचित 15 ते 20 टक्के तसेच गाळप क्षमता वाढीसाठी सुमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. मागील अन्य थकित देणी देण्यासाठी 17 कोटी रुपये जवाहरने दिले आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन गत करारापेक्षा मोबदला कमी मिळाला तरी तो प्रचलित कायद्यातील तरतुदींचा विचार करुन साखर संचालकांसमोर झाला आहे. त्यावर त्यांची सही आहे.
इतकेच काय तर या करारास तत्कालीन सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेही संमती दिली असल्याने हा करार पारदर्शी, कायद्यातील तरतुदी आणि नियमानुसार, आदर्श असा करार असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले. हा करार करताना ऊस उत्पादक सभासदांना सर्वाधिक दर कसा देता येईल याचाच विचार झाल्याचे डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले. श्रीरामची अर्कशाळा चालविताना गतवर्षीच्या करारानुसार दरमहा 19.50 लाख रुपये दरमहा, म्हणजे वार्षिक 234 लाख रुपये मिळणार होते. मात्र नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणाने अर्कशाळा बंद राहिली तर त्या कालावधीचे भाडे मिळणार नव्हते. आता काहीही झाले तरी वार्षिक 250 लाख मिळणार आहेत. शिवाय केवळ इथेनॉल उत्पादन घेतले जाणार असल्याने देशी व विदेशी दारू उत्पादनाचे परवाने अन्य कोणास देवून त्यातून अधिकचे उत्पन्न अर्कशाळेस मिळणार आहे.
त्यामुळे नव्या करारानुसार श्रीरामचा तोटा नव्हे अधिक फायदा होणार आहे, असा विश्वास डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी व्यक्त केला. भागीदारी करार होताना डिपॉझिट दिले जात नाही. तथापि आगामी काळात मागील देणी व अन्य आर्थिक तरतुदी सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कॅश फ्लोनुसार आवश्यक असलेले 17 कोटी रुपये जवाहरने आगाऊ दिले आहेत. त्यापैकी केवळ 8.50 कोटींवर 12 टक्के प्रमाणे व्याज द्यावे लागणार आहे. त्या संपूर्ण रकमेची परतफेड टप्प्याटप्याने होणार असल्याने, करार संपेल त्यावेळी कोणी कोणाचे एक रुपया देणे राहणार नाही. पण 100 कोटी गुंतवणूक केलेल्या 10 हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या नवीन मशिनरीसह संपूर्ण श्रीराम आणि अर्कशाळेची मालकी फक्त श्रीरामच्या सभासद शेतकऱ्यांची राहणार असल्याचे डॉ. शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.
“श्रीराम-जवाहर’कडून सभासदांचे हितच
सन 2021- 22 च्या हंगामात श्रीरामने 5 लाख 5 हजार 425 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून एफ.आर.पी. 2653.70 रुपये प्रति टन असताना प्रतिटन 2761 रुपये प्रमाणे म्हणजे प्रती टन 87.30 रुपये जादा दिले आहेत. एकूण 4 कोटी 41 लाख 73 हजार रुपये ऊस उत्पादकांना जादा दिल्याचे निदर्शनास आणून देत प्रत्येक बाबतीत श्रीराम जवाहरने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहिल्याचे डॉ. शेंडे यांनी नमूद केले.