सातारा – सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीतील सर्व उमेदवार निश्चित विजयी होणार असून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले दोन लाखाच्या मताधिक्याने साताऱ्याची जागा जिंकतील, असा दावा राज्य भाजप कार्यकारिणीचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे व विनित कुबेर यांनी पत्रकार परिषदेत केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा गुरुवारी दि. 17 रोजी दुपारी एक वाजता सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर होणार आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत देशपांडे बोलत होते. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्ष माधवी कदम, दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, सिध्दी पवार आदी उपस्थित होते. देशपांडे म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या सभेत उदयनराजे भोसले यांना साताऱ्यात येण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी मोदी यांच्या सभेचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले आहे.
उदयनराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अवध्या तीन महिन्यांत राजीनामा देऊन मोठे धाडस केले आहे. उदयनराजे यांचे प्रभावक्षेत्र मोठे आहे. त्यामुळे त्यांच्यासह आठ विधानसभा मतदारसंघांतील सर्व उमेदवार विजयी होतील.” युतीच्या उमेदवारांना सातारा जिल्ह्यात जनमत अनुकूल आहे. त्यासाठीच भाजपने अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने साताऱ्यात परिवर्तनाची लढाई निर्णायक टप्प्यात आणली आहे. युतीच्या प्रचाराला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. रिपाई व मित्रपक्ष यांची नाराजी असल्याबाबत देशपांडे यांनी खंडन केले.
मोदी यांच्या सभेला रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. जिल्हा स्तरावर जर कोणाची नाराजी असेल तर ती नाराजी मिटवली जाईल. मोदी यांच्या सभेला सुमारे एक लाख श्रोते जमतील, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. सातारा जिल्हा भाजपचा गड व्हावा, ही खरी आमची धडपड असल्याचे कुबेर यांनी स्पष्ट केले.
सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर आच्छादित मांडव उभारण्यात आला असून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची जय्यत सोय करण्यात आली आहे. एसपीजीसह विशेष सुरक्षा पथक, एनआयए, सुरक्षा यंत्रणांनी सभास्थळाला वेढा दिला असून दोन लष्करी हेलिकॉप्टरची साताऱ्यावर हवाई टेहळणी सुरू आहे. मैदानावर सुरक्षित “डी’च्या पलीकडे “व्हीआयपी’ व श्रोत्यांची व्यवस्था करण्यात आली असून मैदानालगतच हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतुकीत बदल
पशुवैद्यकीय दवाखाना मोकळे मैदान, ठक्कर सिटीमागील मोकळे मैदान, इरिगेशन यांत्रिक विभाग मोकळे मैदान, जरंडेश्वर नाका कोयना सोसायटी मोकळे मैदान, शाहू क्रीडा संकुल, पोलीस परेड ग्राउंड, तालीम संघ मैदान, जुने गोळीबार मैदान, कोडोली जिल्हा परिषद शाळा मैदान, क्रांती स्मृती विद्यालय मैदान, कला वाणिज्य महाविद्यालय मैदान, कोटेश्वर मैदान, भूविकास बॅंक मैदान, शानभाग विद्यालय मैदान, लक्ष्मी विलास हाईटस, यशोदा शैक्षणिक संकुल, रिमांड होम.
पार्किंग व्यवस्था
पोवई नाका- शिवाजी सर्कल- पेंढारकर चौक- डीजी कॉलेजकडून बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणारी वाहतूक गोडोली नाका- अजंठा चौक मार्गाने बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जाईल. एसटी स्टॅन्ड व कनिष्क हॉलकडून बॉम्बे रेस्टॉरंट चौकाला जाणारी वाहतूक वाढेफाटा- सदरबझार- खेड फाटामार्गे बॉम्बे रेस्टॉरंट अशी मार्गस्थ होतील. कोरेगाव बाजूकडून सातारा शहरात येणारी वाहने सोयीनुसार खेडफाटा व गोडोली नाक्याकडून शहरात प्रवेश करतील.
पर्यायी मार्ग
बॉम्बे रेस्टॉरंट चौक, विसावानाका, गोडोली नाका, झेडपी चौक, बांधकाम भवन, होवाळे हॉस्पिटल, कनिष्क हॉल मार्गाकडून सैनिक स्कूलला जाणाऱ्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे बांधकाम भवन ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक दुतर्फा वाहतूक व पार्किंगला प्रतिबंध करण्यात आला आहे. कनिष्क हॉल ते झेड पी चौक ते अण्णासाहेब कल्याणी शाळा चौक मार्ग वाहतूक व पार्किंगला प्रतिबंध करण्यात आला आहे.