माढ्यात सर्व 42 उमेदवारांचे अर्ज मंजूर ; माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघात गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह एकूण 42 उमेदवारांचे 52 अर्ज होते. या सर्व अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या दालनात झाल्यानंतर सर्व 42 उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यानंतर आता सोमवार, 8 एप्रिल रोजी अर्ज माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून दहा, तर 31 अपक्ष रिंगणात आहेत. याशिवाय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजप उमेदवाराला पर्याय म्हणून पूरक अर्ज भरला आहे. यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बहुजन महापार्टीचे शहाजहान शेख, हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील, भारतीय प्रजा पक्षाचे नानासाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव यांच्यासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, सोमवार, 8 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज माघारीनंतर त्याचदिवशी सायंकाळी चार वाजता उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.