नवी दिल्ली – ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्ट घोटाळा प्रकरणात ईडी मार्फत दाखल करण्यात आलेले पुरवणी आरोपपत्र म्हणजे सरकारने पराभवाच्या भीतीने केलेला थिल्लर इलेक्शन स्टंट आहे अशी टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे. भाजपपुढे सध्या जे पराभवाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यापासून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ईडीने जे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे ते मुद्दाम माध्यमांपुढे खुले करून ईडीनेही आपण सरकारचे पोपट आहोत असे दाखवून दिले आहे असे कॉंग्रेसचे प्रवक्ते सुर्जेवाला यांनी म्हटले आहे. अशा थिल्लरपणामुळे मोदी सरकारची एक्झिट डेट आणि भवितव्य बदलणार नाही. मोदींना आणि त्यांच्या सरकारला लोकांनी या आधीच नाकारले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. ऑगस्ता वेस्टलॅंड आणि फिनमेकॅनिका विषयी मोदी सरकारने इटालिच्या कोर्टात सादर केलेल्या सर्व याचिका 8 जानेवारी 2018 रोजीच फेटाळल्या गेल्या आहेत. हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात कोणत्याही भारतीय कर्मचाऱ्याने कोणतेही गैरकृत्य केलेले नाही असा स्पष्ट निर्वाळा मिलान येथील इटलीच्या वरीष्ठ कोर्टाने 17 सप्टेंबर 2018 ला दिला आहे.